देशातील सर्वात मोठा सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात साजरा केला जातो. यंदा करोनाच्या संकटामुळं अनेक निर्बंधांमध्ये हा उत्सव साजरा झाला. विसर्जन मिरवणुकांना बंदी असल्याने वेळेत, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेत यंदाचा गणेशोत्सव पार पडला. त्यामुळे विसर्जन सोहळ्यात सुरक्षा योजनेच्या नियोजनासाठी पोलिसांवरही यावेळी कसलाही ताण आला नाही. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी विशेष शब्दांत जनतेचे आभार मानले आहेत.

पुण्यातील विसर्जन सोहळा संपल्यानंततर पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी ट्विट करुन पुणेकरांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. “कसलाही भपका नाही…मोठमोठ्या मूर्ती नाहीत….मिरवणूक नाही. सारं कसं साधेपणानं, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच. पुढल्या वर्षीही गणेशोत्सव प्रचंड उत्साहानं, पण अशाच शिस्तीनं, इकोफ्रेन्डली पद्धतीनं साजरा होऊ दे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरवर्षी पुण्यात विसर्जन मिरवणुकांचा दणदणाट असतो. शिस्तबद्ध पारंपारिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईला झिंगायला लावणाऱ्या आधुनिक डीजेंपर्यंत सर्वकाही या मिरवणुकांमध्ये पहायलं मिळतं. त्याचबरोबर या मिरवणुका अनुभवण्यासाठी देशभरातून लोक पुण्यात येत असतात. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीत मिरवणूक मार्ग भाविक आणि हौशी पर्यटकांच्या तुडूंब गर्दीनं फुलून गेलेला असतो. अशा परिस्थितीत या गर्दीच्या नियोजनासाठी आणि सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांवर या काळात प्रचंड ताण असतो. सर्वकाही सुरळीत पार पाडण्यासाठी ते जीवचं रानं करीत असतात. यंदा मात्र, यातलं काहीही नव्हतं. त्यामुळे या वर्षी पोलिसांनाही काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळेच पुणे पोलिसांच्यावतीनं पोलीस आयुक्तांना आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या.

दरवर्षी मुख्य विसर्जन मार्गावरुन आलेल्या आणि डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकातील विसर्जन घाटावर विसर्जन झालेल्या गणपतींच्या विसर्जनाची वेळ पोलिसांकडून नोंदवली जाते. यावरुन विसर्जन सोहळ्याला किती वेळ लागला हे सांगता येते. यंदा करोनामुळं मिरवणुकांना बंदी असल्याने सर्व मनाच्या आणि इतर प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची उत्सव मंडपातच कृत्रिम हौद तयार करुन त्यात विसर्जन करण्यात आले. त्यानुसार, पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे मंगळवारी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी विसर्जन झाले. त्यानंतर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीचे (१२.४०), तिसरा मानाचा गुरुजी तालीम मंडाळाच्या गणेशाचे (१२.५५), चौथा मानाचा तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचे (१.०५) तर पाचवा आणि शेवटचा मानाचा गणपती केसरीवाडा गणपतीचे १ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जन झाले. त्यानंतर इतर महत्वाच्या गणपतींमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणेशाचे २ वाजून ४१ मिनिटांनी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडाळाच्या गणेशाचे ७ वाजता तर अखिल मंडई गणपतीचे ७ वाजून १० मिनिटांनी उत्सव मंडपात तयार करण्यात आलेल्या हौदात विसर्जन पार पडले. त्यामुळे सकाळी ११.४४ वाजल्यापासून सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री ७.१० वाजता संपला यावरुन ७ तास ३४ मिनिटं हा सोहळा चालला. दरवर्षी हाच सोहळा तब्बल सुमारे २८ तासांपर्यंत चालतो.