भोसरीतील अजब प्रकार; तीन कार्यकर्ते ताब्यात
गणेशोत्सवासाठी मंडळाला वर्गणी न दिल्याच्या कारणावरून दुकानातील कर्मचाऱ्यांना दमबाजी व शिवीगाळ करत भर रस्त्यावर उठा-बशा काढण्याची शिक्षा देण्याचा अजब प्रकार भोसरीत घडला. याबाबत कार्यकर्त्यांनीच केलेले छायाचित्रण शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
भोसरी-आळंदी रस्त्यावरील ‘क्राऊन’ या बेकरीत सहा दिवसापूर्वी हा प्रकार घडला. बेकरीत वर्गणीसाठी हे कार्यकर्ते आले. त्यांनी १५१ रूपयांची पावती फाडली. तथापि, मालक नसल्याने पैसे देता येणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले, तेव्हा कार्यकर्ते संतापले. त्यांनी शिवीगाळ सुरू केली आणि एकेक करत सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर बोलावले. एका रांगेत उभे करून त्यांना उठा-बशा काढण्याची शिक्षा फर्मावली. बसताना आणि उठताना ‘सॉरी’ म्हणण्यासाठी बजावले. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. या वेळी मंडळातील इतर कार्यकर्त्यांनी या घटनेचे छायाचित्रण सुरू केले. आतापर्यंत या घटनेबाबतची कल्पना कोणाला नव्हती. मात्र, ते छायाचित्रण शनिवारी व्हायरल झाले. वाहिन्यांवर बातम्या सुरू झाल्या आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. ते दुकान त्यांनी शोधून काढले. मात्र, आमची काही तक्रार नाही, असा दुकानातील कर्मचाऱ्यांचा सूर होता. पोलिसांनी त्यांना गाडीत बसवून ठाण्यात नेले. पोलिसी पद्धतीने एकेक नावे त्यांनी वदवून घेतली. त्यानंतर, तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. उशिरापर्यंत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.