प्राची आमले

समाजमन बिघडवणारे माध्यम अशी समाजमाध्यमांची प्रतिमा तयार होत असताना, याच समाजमाध्यमांचा चांगला वापर करत शहारातील सर्व छोटय़ा-मोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या गटाविषयी..

काळ, वेळ आणि वेगाच्या सगळ्या गणितांवर मात करत त्या पलीकडे जाऊन पोहोचलेली एक गोष्ट म्हणजे समाजमाध्यम. समाजमाध्यम अनेकदा चर्चेत राहतात ते त्यांच्या वापरातून होणाऱ्या नकारात्मक गोष्टींसाठी. पण याच माध्यमांवर थोडा डोळसपणे फेरफटका मारला तर इथे चाललेल्या अनेक सकारात्मक गोष्टीही आपण पाहिल्या आहेत. गणेश मंडळे म्हटलं, की कोणत्याही संकटामध्ये मग ते नैसर्गिक असो किंवा वैयक्तिक, अडीअडचणीला धावून जाणारे कार्यकर्ते ही प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. हे कार्यकर्ते आता तंत्रज्ञानाभिमुख झाले आहेत. शहरातील तीनशे गणेश मंडळे समाजमाध्यमांवर एकत्र येऊन अनेक विधायक उपक्रम राबवीत आहेत.

ऐतिहासिक वारसा लाभणारी, सामाजिक कार्यात वर्षांनुवर्षे सातत्याने भरीव कामगिरी करणारी अनेक छोटी-मोठी मंडळे ही पुणे शहराचे भूषण ठरली आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या काळात नाही तर वर्षभर अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवीत आदर्श निर्माण करत आहेत. शहरामध्ये ‘गणेश व्यासपीठ’ नावाचा व्हॉट्स अ‍ॅप समाजातील वंचित लोकांसाठी काम करत आहे.

‘गणेश व्यासपीठ’ हा गट तीन वर्षांपूर्वी सुरू झाला. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे सध्या गणेश व्यासपीठचे तीन ते चार व्हॉट्स अ‍ॅप गट नव्याने सुरू झाले असून प्रत्येक गटात पन्नास ते साठ मंडळांचा समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासाठी ‘गणेश व्यासपीठ मध्य’, दक्षिण भागासाठी ‘गणेश व्यासपीठ दक्षिण’, उत्तर भागासाठी ‘गणेश व्यासपीठ उत्तर’ असे गट आहेत. या गटांमध्ये विविध मंडळांडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयीच्या माहितीची देवाणघेवाण केली जाते.

‘गणेश व्यासपीठ’ गटाच्या स्थापनेविषयी सदस्य पीयूष  शहा म्हणाले, तीन वर्षांपूर्वी खडकवासला धरणातून गाळ काढण्याच्या कामासाठी या गटाची सुरुवात करण्यात आली. त्या वेळी या गटाच्या माध्यमातून तीनशे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केले. दररोज वेगवेगळ्या मंडळाचे कार्यकर्ते जवळपास ९० दिवस हे काम करत होते. सर्व मंडळांच्या सहकार्याने हे काम यशस्वी झाले. हा गटाचा पहिला आणि सर्वात मोठा उपक्रम होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर गट बंद न करता वर्षभर विविध उपक्रम राबविल्यास अनेक गरजू व्यक्तींना मदत होईल या हेतूने हा गट पुढे सुरू राहिला. अनेक छोटी-मोठी मंडळे यामध्ये सहभागी झाली.

गटाच्या माध्यमातून वर्षभर अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आदिवासी भागातील मुलांसह दिवाळी साजरी करणे, रक्तदान शिबिर, दृष्टिहीन जोडप्यांच्या लग्नाचा खर्च, गडचिरोली भागात सौर दिवे बसवण्यासाठी अर्थिक मदत, अन्न भेसळ आणि अवयवदान या विषयावर जनजागृती करण्यात येणाऱ्या ३० हजार पुस्तिकांचे वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व कामांमध्ये समाजमाध्यमांची मोठी भूमिका ठरली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि मंडळांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग झाला. शहरातील कोणतीही समस्या असो किंवा एखादा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच मंडळे सहकार्य करतात. समाजमाध्यमांमुळे उपक्रमांविषयी,  कोणत्या मंडळात कोणता उपक्रम राबविण्यात येतो याविषयी माहिती मिळते व शहरातील विविध मंडळे एकत्र येऊन काम करत आहेत.

आगामी उपक्रमांविषयी शहा म्हणाले,  सर्व मंडळांनी एकत्र येऊन भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा मानस असून त्यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे. मंडळातील कार्यकर्त्यांनी एका झाडाची जबाबदारी घेऊन त्याचे संवर्धन करावे असा प्रयत्न असणार आहे. गटाचे काम हे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे.