ढोल-ताशांचा दणदणाट, रांगोळ्यांच्या पायघडय़ा, फुलांचे रथ आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर अशा उत्साहाच्या व भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीतील वैभवशाली गणेशोत्सवाला गुरुवारी थाटात प्रारंभ झाला. मानाच्या मंडळांसह शहरातील शेकडो मंडळांनी मिरवणुका काढून त्यानंतर ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना केली. सार्वजनिक मंडळांकडून उत्सव साजरा होत असतानाच घरोघरी देखील मोठय़ा भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुण्यातील मानाच्या मंडळांनी पारंपरिक थाटात व उत्साहात गुरुवारी मिरवणुकांचे आयोजन केले होते. मानाच्या मंडळांसह शहरातील मंडळांनी काढलेल्या मिरवणुकांमुळे वातावरण गणेशमय झाले. गणरायाच्या स्वागताची तयारी गेले महिनाभर शहरात सर्वत्र तयारी सुरू होती आणि गुरुवारी गणरायाचे आगमन झाले. गणरायासाठी पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य, प्रसाद आदींच्या खरेदीत गणेशभक्त मग्न होते.
चांदीच्या पालखीतून मिरवणूक
मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी चांदीच्या पालखातून काढण्यात आली होती. नारायण पेठेतील मूर्तिकार नीलेश पार्सेकर यांनी तयार केलेल्या ‘श्रीं’च्या मूर्तीची देखणी मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी झाली होती. नगरा, ढोलताशा पथक आणि बँडच्या वादनात निघालेली मिरवणूक उत्सव मंडपात आली. त्यानंतर इंदूरच्या त्रिपदी परिवाराचे डॉ. प्रदीप ऊर्फ बाबामहाराज तराणेकर यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाने नगर जिल्ह्य़ातील एक गाव दत्तक घेतले असून मंडळातर्फे यंदा उत्सवात एक मूठ धान्य असा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या मंडळाचीही मिरवणूक सकाळी काढण्यात आली. नगारावादन, ढोलताशा पथके आणि बँडपथकांचा मिरवणुकीत सहभाग होता. मूर्तिकार विठ्ठल गिरे यांनी मंडळासाठी मूर्ती तयार केली आहे.
गुरुजी तालीम मंडळाचा फुलांचा रथ
मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना दुपारी पाऊण वाजता करण्यात आली. त्या आधी प्रथेप्रमाणे मंडळाने वाजत गाजत मिरवणूक आयोजित केली होती. फुलांच्या रथात गणराय विराजमान झाले होते. दुष्काळाच्या परिस्थितीत मंडळाने मुख्यमंत्री निधीला एकवीस हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने यंदा ‘शिवपार्वती महाल’ हा देखावा केला आहे.
तुळशीबाग मंडळातर्फे चांदीची प्रभावळ
श्री तुळशीबाग मंडळानेही मिरवणूक काढून ‘श्रीं’ची मूर्ती उत्सव मंडपात आणली. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. नगरावादन आणि शौर्य, गजलक्ष्मी, रुद्रगर्जना, नादब्रह्म ही ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. मंडळाने यंदा चांदीची भव्य प्रभावळ तयार केली आहे.
केसरीवाडय़ात महिनाभर कार्यक्रम
श्री केसरीवाडा सार्वजनिक गणपती ट्रस्टचा उत्सव टिळक पंचागाप्रमाणे श्रावण चतुर्थीला (१८ ऑगस्ट) सुरू झाला आहे. या निमित्ताने केसरीवाडय़ात गेला महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दाते पंचागाप्रमाणे सुरू झालेल्या गणेशोत्सवात नित्य पूजाअर्चा तसेच धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सकाळी मंदिरापासून सुरू करण्यात आली. ‘श्रीं’साठी फुलांचा रथ तयार करण्यात आला होता. तेथून ही मिरवणूक बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौक, शनिपार चौक, महात्मा फुले मंडई या मार्गाने उत्सव मंडपात पोहोचली. वाशिम येथील विजयकाका पोफळी महाराज यांच्या हस्ते सकाळी दहा वाजून एकतीस मिनिटांनी प्रतिष्ठापनेचा सोहळा पारंपरिक पद्धतीने करण्यात आला.
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाच्या श्रीशारदा गजाननाची मिरवणूक उत्सव मंडपात आल्यानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे आणि त्यांची पत्नी विद्या यांच्या यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजता करण्यात आली. आढाव बंधूंचे नगारावादन त्यानंतर नूमविय, आदिराज्य ही पथके असा मिरवणुकीचा क्रम होता. मंडळातर्फे यंदा मुख्यमंत्री सहायता निधीला एकवीस हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मंडळ तसेच राजन काची, किशोर काची यांच्यातर्फे बीड जिल्ह्य़ातील कडा, आष्टी येथील जनावरांसाठी चारा पाठवण्यात आला.
श्री भाऊ रंगारी मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणुकीत आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या मिरवणुकीत श्रीराम, ब्रह्मचैतन्य, वाद्यवृंद ही पथके सहभागी झाली होती.
बाबू गेनू मंडळाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना एनडीए स्टुडिओतील कलाकार मुरलीधर शिंदे आणि सुरेश कपूर यांच्या हस्ते दुपारी एक वाजता करण्यात आली. त्यापूर्वी फुलांच्या रथातून ‘श्रीं’ची मिरवणूक काढण्यात आली.