विसर्जन घाट, स्वागत कक्ष, सार्वजनिक स्वच्छता, विद्युत व्यवस्थेचा आढावा

गणेश विसर्जन तयारीच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख विसर्जन घाट, स्वागत कक्ष, सार्वजनिक स्वच्छता, विद्युत व्यवस्था अशा विविध कामांची महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी पाहणी करून आढावा घेतला. विसर्जना दरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केली.

गणेश विसर्जनाच्या तयारीच्या दृष्टीने पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडून त्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील साफसफाई, औषधोपचाराची व्यवस्था, निर्माल्य कलश, कीटकनाशकांची फवारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी या कामाची पाहणी केली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, विभाग प्रमुख, संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

अलका टॉकीज चौकातील महापालिकेचा स्वागत कक्ष, नटराज सिनेमा मागील नदीकाठचा भाग, लकडी पूल, गरवारे महाविद्यालयाची मागील बाजू, येरवडा येथील सद्गुरू सयाजीराव चौक जवळील विसर्जन घाटाची पाहणी या वेळी करण्यात आली. विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, जीवरक्षकांच्या नेमणुका, अग्निशमन यंत्रणा, विद्युत व्यवस्था, आरतीसाठीचे आवश्यक चौथरे, निर्माल्य कलश, शास्त्रीय पद्धतीने पण पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी देण्यात येणारे अमोनियम बाय काबरेनेटची वितरण व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला. त्या-त्या भागातील स्थानिक नागरिक, मंडळांचे पदाधिकारी यांच्याशीही त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्गावर महापालिकेच्या वतीने साफसफाईचे नियोजन करण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी कंटेनर, विसर्जन घाटांवर औषध फवारणी, तलाव, विहीर नसलेल्या भागात विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, अत्यावश्यक सेवांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती या वेळी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्षही सज्ज

महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबरच अग्निशमन विभागाकडूनही आवश्यक ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या १०१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ०२०-२५५०/१२६९, ०२०-२५५०/६८००/१/२/३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाच्या अध्यक्षांचा पालिकेकडून सत्कार

महापालिकेच्या वतीने अलका टॉकीज चौकात स्वागत मंडप उभारण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्षकांना महापालिकेकडून श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे विविध पदाधिकारी, नगरसेवकांसमवेत काही अधिकाऱ्यांच्याही नेमणुका केल्या आहेत.