पिंपरी-चिंचवडमध्ये यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेश उत्सव पार पडत आहे. मात्र, या कालावधीत मिरवणुकीत बेभान होऊन नाचणाऱ्यांमुळे नेहमी वाद निर्माण होण्याचे प्रसंग घडतात. गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या तळीरामांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, यंदा यासाठी पोलिसांनी यासाठी विशेष तयारी केली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ११४९ जणांवर पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ऐकून २६ प्रमुख घाट असून ६६१ गणपती मंडळ आहेत. ही सर्व ठिकणे ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असतील. तसेच १५०० पोलीस कर्मचारी, ५५० पोलीस मित्र , ९९ पोलीस उपनिरीक्षक आणि सहाययक पोलीस निरीक्षक, २० पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपायुक्त ,२ सहाययक पोलीस उपायुक्त, असा बंदोबस्त मिरवणूक कार्यक्रम सुरक्षित पार पाडण्यास सज्ज आहे.

आतापर्यंत १५ डीजेंवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तुंना स्पर्श करू नये. त्याचबरोबर मिरवणुकीत जाताना सोन्याचे दागिने घालू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले. प्रत्येकवर्षी नवीन गाण्याचं फॅड हे मिरवणुकीत पाहायला मिळतं या वर्षी देखील ‘आला बाबुराव’ या गाण्याची क्रेझ पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत आहे. या गाण्यासोबतच ‘आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ हाय’ म्हणत डॉल्बीचा आवाज दुमदुमतो. या सर्वाचा त्रास खऱ्या गणेश भक्ताला होतो. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत खऱ्या गणेश भक्तांनाच सहभागी होऊन द्यावे, डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक ठेवू नका, अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.