08 March 2021

News Flash

यंदा विसर्जन मिरवणूक किती तासांची?

पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्याच्या वेगवेगळय़ा भागांतून नागरिक येतात.

विसर्जन मार्गासह शहरात आज मोठा बंदोबस्त, नऊ हजार पोलिसांची फौज तैनात

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (५ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. यंदाची विसर्जन मिरवणूक किती तासांची असेल याची उत्सुकता सामान्यांना देखील आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ वाढत चालला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह संपूर्ण शहरात नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्याच्या वेगवेगळय़ा भागांतून नागरिक येतात. गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने परदेशी पर्यटक हजेरी लावत आहेत. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकासंदर्भात दिलेले आदेश पाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची सुरुवात होण्यापूर्वी शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला होता. उत्सवाच्या कालावधीत आतापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीची सांगता होण्यास वेळ लागत आहे. मिरवणुकीसाठी चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर बदल केले जातात. मध्यभागातील सर्व पेठांमधील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात, त्यामुळे सामान्यांची कुचंबणा होते, असा अनुभव आहे.

पोलिसांची धक्का पथके गायब; मिरवणूक कार्यकर्त्यांवर सोपवली

काही वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत धक्का पथके असायची. पोलिसांची धक्का पथके मिरवणूक मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करायची. धक्का पथकामुळे मिरवणुकीचा वेग वाढायचा, मात्र गेल्या काही वर्षांपासून पोलिसांकडून फारसा हस्तक्षेप केला जात नाही. कार्यकर्त्यांशी वाद घालण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी काळजी पोलिसांकडून घेतली जाते. एक प्रकारे मिरवणूक कार्यकर्त्यांवर सोपवून देण्याचा प्रकार वाढीस लागला आहे.

मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी फारसे प्रयत्न नाहीत

विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी पोलीस तसेच मंडळांकडून फारसे प्रयत्न केले जात नाहीत, असे चित्र आहे. मानाच्या मंडळांची मिरवणूक संपण्यास साधारण सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. सायंकाळी सातनंतर रोषणाईची मंडळे विसर्जन मार्गावर येतात. रात्री बारानंतर ध्वनिवर्धक बंद ठेवण्यात येतात. त्यानंतर विसर्जन मिरवणूक जवळपास रेंगाळते. त्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजता ध्वनिवर्धक सुरू झाल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ होते. मंडळांकडूनदेखील विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. प्रमुख मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक मार्गावरील मंडळांच्या कार्यकर्त्यांना अक्षरश: हाताला धरून गणपतीचा रथ पुढे नेण्याची विनंती पोलिसांना करावी लागते, असा अनुभव आहे.

दृष्टिक्षेपात बंदोबस्त

  • शहरात नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त
  • विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
  • विसर्जन मार्गाची बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी
  • साध्या वेशातील पोलिसांची गस्त
  • टिंगलटवाळी तसेच चोऱ्या रोखण्यासाठी खास पथक
  • शहरातील प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद
  • विसर्जन मार्गावर पोलिसांचे मनोरे
  • राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा बंदोबस्तासाठी
  • गृहरक्षक दलाच्या जवानांचे साहाय्य
  • आपतकालीन टोल फ्री क्रमांक- १०९०/१०९१/१००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 3:32 am

Web Title: ganesh visarjan 2017 pune ganpati miravnuk
Next Stories
1 गणेश विसर्जन तयारीची महापौरांकडून पाहणी
2 उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीची जगभरातील भूकंपमापक यंत्रांवर नोंद
3 शहरबात पुणे : हद्दवाढीतून काय साध्य होणार?
Just Now!
X