‘तुझ्यात जीव रंगला’वरही नाच; ‘झिंगाट’, ‘शांताबाई’चा विसर

गणरायाला निरोप देणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत ‘झिंगाट’ होऊन नाचताना ‘तरुणाई’ने सदाबहार जुन्या गाण्यांना पसंती तर दिलीच, शिवाय काही नव्या गाण्यांनाही डोक्यावर घेतले. यंदा ‘आलाय बाबुराव’, सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाही काय’ आणि ‘बोल मैं हलगी बजाऊ क्या’ अशा गाण्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. त्या तुलनेत ‘शांताबाई’ आणि ‘झिंग झिंग झिंगाट’चा विसर पडल्याचे दिसून आले. ‘राणा दा’ आणि ‘पाठक बाईं’च्या प्रेमकथेवर आधारित ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या शीर्षकगीतावरही नाचण्याची हौस नाचणाऱ्यांनी भागवून घेतली.

उडत्या चालींच्या गाण्यांवर बेफाम होऊन नाचणारा एक वर्ग विसर्जन मिरवणुकीत असतो. व्यवस्थितपणे नाचता येत नसले, तरी मिरवणुकीत वाजणाऱ्या संगीताच्या तालावर ‘नागोबा’सारख्या विशिष्ट हालचाली करता येतील, अशा गाण्यांची आग्रही मागणी असते. त्यामुळेच अशा ‘फर्माइशी’ गाण्यांनी दरवर्षी धमाल उडवून दिल्याचे दिसून येते. अलीकडच्या काळात, ‘वाट बघतोय रिक्षावाला, ‘शांताबाई’, ‘झिंग झिंग झिंगाट’ सारख्या गाण्यांनी धुमाकूळ घातल्याची उदाहरणे ताजी आहेत. त्याच परंपरेतील काही गाण्यांनी या वर्षी अक्षरश: कल्ला केला आहे. त्यामध्ये ‘आलाय बाबुराव’ हे गाणे मिरवणुकीत आघाडीवर होते. बहुतांश मंडळांमध्ये हे गाणे पुन्हा-पुन्हा लावण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी ‘सोनू’च्या शृंखलेने कहर केला होता. तेच ‘सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाय काय’, हे गाणेही या वेळी धमाल करून गेले. याशिवाय, ‘ब्रिंग इट ऑन’, ‘सुया घे, पोत घे’, ‘शालू नाच’, ‘आम्ही लग्नाळू’, ‘हृदयी वसंत फुलताना’ अशा गाण्यांची सातत्याने फर्माइश होत होती. याशिवाय, ‘मी बाबुराव बोलतोय’, ‘गढूळाचे पाणी, ‘बाई वाडय़ावर या’, ‘आवाज वाढव तुझ्या.’, चिमणी उडाली भुर्र्र’, ‘बानू बया-बानू बया’, ‘तुझ्या रूपात चांदणं पडलया’, ‘जीव झाला येडापीसा’, ‘डोकं फिरलया’, ‘कोंबडी’, ‘मुंगळा’, तसेच ‘मैं हूँ डॉन’, ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम’, ‘सपने मे मिलती है’, ‘राम जी की निकली सवारी’, ‘जानम समझा करो’ अशा अनेक गाण्यांची ‘गणपती डान्सर्स’मध्ये मागणी होतीच. ‘झी मराठी’च्या बहुचर्चित ‘जीव तुझ्यात रंगला’ या मालिकेच्या शीर्षक गीताने त्यात भर टाकली.

उडत्या चालींच्या या गाण्यांमुळे नाचणाऱ्यांची हौस भागत असली, तरी अनेकांच्या दृष्टीने हा प्रकार डोकेदुखीचा ठरतो. ‘झfxगाट’ होऊन नाचणाऱ्यांना आवरता येत नाही. एकदा गाणे वाजवून संपलेले या मंडळींना चालत नाही. त्यांचा ‘वन्स मोअर’चा धोशा सुरूच राहतो. वादकांना तर नको-नको होतेच, विसर्जन मार्गावरील मंडळे पुढे काढण्यासाठी आग्रही असणाऱ्या पोलिसांनाही अशा ‘नाचोबां’चा त्रास असतोच असतो.