पुणे : पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दीड दिवसांच्या गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील विविध घाटांवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती. शहरात घराघरांमध्ये सोमवारी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. घराण्याच्या रीतरिवाजानुसार काही घरांमध्ये दीड दिवसांनी गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यानुसार मंगळवारी तिन्हीसांजेनंतर विविध विसर्जन घाटांवर गर्दी झाली होती. विसर्जन घाटांवर ठिकठिकाणी आरतीचे सूर निनादत होते. अमृतेश्वर घाट, रिद्धी-सिद्धी घाट, पांचाळेश्वर घाट या घाटांवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी खडकवासला धरणातून पुरेसे पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आले होते. महापालिकेने घाटांवर उभारलेल्या हौदांमध्ये अनेकांनी गणपती विसर्जन केले. तर, नदीचे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशातून काहींनी घरातच बादलीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले.