पिंपरी, भोसरीत होणारे महोत्सव रद्द; साधेपणाने उत्सव करणार

पिंपरी : करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने, वर्गणी गोळा न करता आणि जनजागृतीवर भर देत साजरा करण्याचा निर्धार पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी केला आहे. उत्सवानिमित्त होणारे पिंपरी-चिंचवड महोत्सव, भोसरी महोत्सव यांसारखे सांस्कृतिक उपक्रम रद्द करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास हजार गणेश मंडळे आहेत. आकर्षक सजावटी आणि उत्तम देखावे सादर करण्याची चढाओढ प्रमुख मंडळांमध्ये असते. आकुर्डी, चिंचवड, भोसरी भागातील मंडळांची प्रबोधनपर देखावे करण्याची परंपरा आहे. यंदाच्या उत्सवावर पूर्णपणे करोनाचे संकट आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे उत्सव साजरा करता येणार नसल्याची नाराजी सर्वच घटकात आहे.

टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सगळेच अर्थकारण कोलमडून पडले आहे, त्याचा फटका मंडळांना बसला आहे. नागरिकांच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून वर्गणी न मागण्याचा निर्णय बहुतांश मंडळांनी घेतला आहे. प्रायोजकही मिळणार नसल्याने सभासदांच्या वर्गणीतूनच उत्सवकाळातील खर्च भागवला जाणार आहे.  दरवर्षी आढळून येणारे भव्य मंडप, आकर्षक कमानी यंदा नसतील. गणेशमूर्ती ठेवण्यासाठी असणाऱ्या मंदिरातच प्रतिष्ठापना केली जाईल.  मात्र, मंडळ परिसरात करोनाविषयक जनजागृती व आरोविषयक उपक्रम राबवण्याचा संकल्प मंडळांनी केला.

यंदा मंडळाच्या वतीने वर्गणी गोळा केली जाणार नाही. आरोग्यविषयक, जनजागृतीचे उपक्रम राबवले जातील. मंडप, सजावट, देखावे असे काहीही असणार नाही. गणरायाचे आगमन, विसर्जन, दररोजची आरती मोजक्या जणांच्या उपस्थितीत होईल. गर्दी टाळून, शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा केला जाईल.

– दत्ता पवळे, अध्यक्ष, जय बजरंग मंडळ, निगडी

अतिशय साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले आहे. मंदिरातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होईल. वर्गणी गोळा केली जाणार नाही. दररोजची पूजाअर्चा होईल. गणेश आरती कार्यकर्त्यांच्या हस्तेच होईल.  शासकीय नियमांचे पालन होईल, याची खबरदारी घेतली जाईल.

– उल्हास शेट्टी, अध्यक्ष, तरूण मित्र मंडळ, आकुर्डी