गणेशोत्सव काळात अनेकांना रोजगार मिळत असतो. यातून कोट्यवधी रूपयांची दरवर्षी उलाढाल होत असते. असाच एक पुण्यातील ‘वारे अ‍ॅण्ड सन’ समूह मागील 70 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत डोक्यावर गॅसबत्तीच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक प्रकाशमान करण्याचे काम करीत होते. या 70 वर्षाच्या काळात आजवर डोक्यावर गॅसबत्ती घेऊन जाणारे कामगार पुणेकर नागरिकांनी अनेकदा पाहिले आहेत. पण, आता हा उत्सव प्रकाशमान करणारे कामगार मिळत नसल्याने विसर्जन मिरवणुकीत ही सेवा देण्याचे काम थांबविण्याची वेळ गेल्या दोन वर्षांपासून वारे कुटुंबावर आली आहे.

या व्यवसायाविषयी वयाची सत्तरी पार केलेले शंकर आणि ज्ञानेश्वर वारे या आजोबांसोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, “शनिवार पेठेत आमचे वडील लक्ष्मण खंडेराव वारे यांनी 1948 साली गॅसबत्तीचा व्यवसाय सुरू केला. त्याकाळी आताप्रमाणे वीजेची व्यवस्था सायंकाळनंतर नव्हती. तेव्हा रस्त्यावर असलेल्या खांबावर कंदील लावले जात होते. पण त्यातून रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडत नव्हता आणि तेव्हा गावागावामध्ये जत्रा, सण, कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असत. तेव्हा आमचे वडील लक्ष्मण खंडेराव वारे यांनी जर्मन कंपनीच्या रॉकेलवर चालणार्‍या काही बत्ती विकत घेतल्या. अशाप्रकारच्या बत्ती एकमेव आमच्याकडे होत्या. या बत्तीच्या माध्यमातून संपूर्ण परीसर काही क्षणात प्रकाशमान होत असत. पहिल्यांदा आम्ही 10, 15 बत्ती घेतल्या होत्या. नंतर, वाढत्या मागणीमुळे एका बत्तीवरुन सुरू झालेला आमचा व्यवसाय तब्बल 500 बत्तींवर जाऊन पोहोचला. या दरम्यान सर्वाधिक गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत बत्तीला मागणी असायची. या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहिले. पण आम्ही कधीच डगमगलो नाही. कारण आमच्यासोबत तेवढ्याच ताकदीने कामगार देखील उभे राहत असत. त्यामुळे काम करण्यास आणखी ऊर्जा मिळत होती. अगदी सुरुवातीला 50 पैशांवर बत्ती देण्यास सुरुवात केली. आज 700 रुपये आम्ही घेतो. कारण या बत्तीसाठी रॉकेल चांगल्या दर्जाचे लागते. त्यामध्ये थोडासा देखील कचरा लागत नाही आणि त्यात डोक्यावर घेऊन चालणार्‍या कामगाराच्या मजुरीचा देखील समावेश असतो. आता एवढी मजुरी वाढली असताना देखील आम्ही व्यवसाय सुरू ठेवला आहे. पण या कामासाठी मजुर मिळत नाही. त्यामुळे आता बत्ती देण्याचा व्यवसाय जवळपास आमचा बंद झाला आहे. तसेच आता आमच्याकडे असणार्‍या 500 बत्तींमधील केवळ आज 10 बत्ती आहेत. इतर सर्व विकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रकारे आम्ही दोघा भावांनी किमान 60 वर्ष हा व्यवसाय सांभाळला तसा आता पुढची पिढी या व्यवसायात येण्यास नको म्हणत आहे. हे सांगताना ते भावूक झाले होते. डोक्यावर घेऊन जाणार्‍या बत्ती पाहण्यास पुणेकरांची विसर्जन मिरवणुकीमध्ये एकच गर्दी असायची. हे क्षण पाहण्यास पुणेकर एकच गर्दी करीत असत. पण आता कामगार मिळत नसल्याने मागील दोन वर्षापासुन ही सेवा देण्याचे काम बंद केले आहे”.

वारे यांच्या बत्तींनी चित्रपटदेखील प्रकाशमान करण्याचे काम केले –
सत्यम शिवम सुंदरम, मंगल पांडे, देवदास, जिस देश में गंगा बहती है, यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांसह दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटात वारे यांच्या बत्तीने प्रकाश देण्याचे काम केले आहे.