पुणे : पुणे-मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही अतिशय साधेपणाने साजरा होत आहे. त्याचा मोठा फटका नारळ विक्रीला बसला असून उत्सव काळातील नारळी विक्रीची उलाढाल २० ते २५ टक्क्यांनी घटली आहे.

गणेशोत्सवात नारळाची सर्वाधिक विक्री पुणे आणि मुंबईत होते. दरवर्षी उभारल्या जाणाऱ्या उत्सव मंडपांच्या परिसरात नारळाचे तोरण विक्रेते तात्पुरत्या स्वरूपात दुकाने थाटतात. यंदा मात्र, रस्त्यावर दुकाने थाटण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. करोना संसर्गामुळे भाविकांना यंदाही लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे. मंदिरे बंद असल्याने भाविकांना तोरणही अर्पण करता येत नाही. त्यामुळे नारळ विक्रीत मोठी घट झाली आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील भुसार बाजारातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.

तोरणासाठी विक्रेते नवा नारळ वापरतात. नवा नारळ कोवळा असतो. नारळाची आवक तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून होते. नारळाच्या सापसोल, मद्रास, पालकोल या प्रमुख जाती आहेत. कर्नाटकातील सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळाला उपाहारगृहचालक आणि खाणावळ चालकांकडून मागणी असते. आंध्रप्रदेशातील पालकोल नारळाला घरगुती ग्राहकांकडून मागणी असते. सापसोल, मद्रास आणि पालकोल जातीच्या नारळाचे खोबरे जाड आणि चवीला गोड असते. श्रावण महिन्यानंतर नारळाच्या मागणीत वाढ होते. दिवाळीपर्यंत नारळांना चांगली मागणी असते.

उलाढालीवर परिणाम : करोनापूर्वी गणेशोत्सवात राज्यभरात साधारणपणे ८० ते ९० लाख नारळांची विक्री व्हायची. प्रमुख मंडळे आणि देवस्थानांना तोरण अर्पण केल्यानंतर पुन्हा नारळ बाजारात विक्रीस पाठविले जायचे. तोरणाचे नारळ कमी दरात पुन्हा तोरण विक्रेत्यांना विकले जायचे. गेल्या दोन वर्षांपासून नारळ विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाच्या वर्षी उत्सवात मार्केटयार्डातील भुसार बाजार तसेच वाशीतील नवी मुंबईतील बाजारात एकूण मिळून ३० ते ३५ लाख नारळांची आवक झाली आहे. करोना संसर्गापूर्वी उत्सवात या दोन्ही बाजारात मिळून ५० लाखापर्यंत नारळाची आवक व्हायची. नारळ विक्रीतून मोठी उलाढाल व्हायची.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मानाची मंडळे तसेच मुंबईतील लालबागचा राजा, श्री सिद्धिविनायकास भाविक तोरण अर्पण करतात. उत्सवाच्या कालावधीत राज्यातील विविध गणेश मंदिरात भाविकांची गर्दी होते. श्रद्धेपोटी भाविकांकडून तोरण अर्पण केले जाते. मात्र, मंदिरे, देवस्थाने बंद असल्याने नारळ विक्रीत मोठी घट झाली आहे. घरगुती गणेशोत्सव देखील गेल्या वर्षी साधाच साजरा झाला होता. त्यातुलनेत यंदा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांकडून नारळाला मागणी चांगली आहे तसेच मिठाई विक्रेत्यांकडून मोदकांसाठी नारळाला मागणी आहे. – दीपक बोरा, नारळ व्यापारी, भुसार बाजार, मार्केटयार्ड

दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भाविकांनी उत्सव काळात तोरण अर्पण केले. त्यातील नारळांची संख्या सुमारे पंचवीस लाख होती. भाविक पाच, अकरा, एकवीस अशा नारळांचे तोरण अर्पण करतात. काही भाविक तर पोतेभर नारळ ‘श्रीं’च्या चरणी अर्पण करतात. – महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

 

किरकोळ बाजारात एका नारळाचा भाव

तोरणाचा नारळ- १८ ते २५ रुपये

सापसोल- ३० ते ४० रुपये

मद्रास- ३० ते ४० रुपये

पालकोल- ३० ते ४० रुपये