News Flash

करोनाबाधित रुग्णांना लूटणारी टोळी सक्रिय

एका ‘रेमडेसिविर’साठी ४० हजारांचा भाव

(संग्रहित छायाचित्र)

एका ‘रेमडेसिविर’साठी ४० हजारांचा भाव

पिंपरी: करोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना संगनमताने लुटण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात वाढू लागल्यानंतर पोलीस आणि महापालिका यंत्रणा सक्रीय झाली आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा या साखळीत सहभाग असल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. ‘व्हेंटिलेटर’ खाटेसाठी लाख रुपये घेतले, त्या प्रकरणात तीन डॉक्टरांना बेडय़ा पडल्या आहेत. तरीही लुटीचे प्रकार सुरूच आहे. काळाबाजारात ‘रेमडेसिविर’च्या एका इंजेकशनसाठी ४० हजाराचा भाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयातील खाटा पूर्णपणे भरल्या आहेत. नव्याने सकारात्मक (पॉझिटिव्ह) आढळून येणाऱ्या रुग्णांसाठी जागा नाही. गंभीर अवस्थेतील रुग्णांना प्राणवायू तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटा मिळत नाही. खाटा मिळवून देण्यासाठी पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांविषयी सर्वाधिक तक्रारी आहेत.

विनामूल्य वैद्यकीय सेवा असतानाही चिंचवडच्या करोना काळजी केंद्रात खाट मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचे प्रकरण चव्हाटय़ावर आले. इतरही ठिकाणी असेच प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे. ‘रेमडेसिविर’साठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला, तेव्हा एका ‘रेमडेसिविर’साठी ४० हजार रुपये भाव असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात एका परिचारिकेसह तिघांवर गुन्हा दाखल झाला. याशिवाय, शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या काही रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना गजाआड करण्यात आले. त्यांनी तब्बल ४० ‘रेमडेसिविर’ची विक्री केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. अशाप्रकारे विविध मार्गाने लुटणारी विशिष्ट साखळी शहरभरात कार्यरत असून त्यांचा छडा लावण्याचे काम पोलीस करत आहेत.

मृतांचे पैसे, दागिने लंपास

करोनाबाधित रुग्ण मयत झाल्यानंतर त्याच्याकडील वस्तू, पैसे तथा दागिने चोरीला जाण्याच्या घटना रुग्णालयांमध्ये होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून ठोस पुरावे मिळाल्यानंतर अशा प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

खाट मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये स्वीकारण्यात आल्याच्या प्रकरणात डॉ. प्रवीण जाधव, डॉ. सचिन कसबे, डॉ. शशांक राळे यांना अटक करण्यात आली आहे. रुग्णांची अडवणूक करून पैसे उकळण्याचा प्रकार खंडणीसारखाच आहे. असे प्रकार इतरही काही रुग्णालयात  होत असावेत. ज्यांना पैसे मागण्यात आले आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, जेणेकरून अशाप्रकारे लूटमार करणाऱ्यांवर कारवाई करता येऊ शकेल.  – कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 2:21 am

Web Title: gang active robbing corona patients in pune zws 70
Next Stories
1 पिंपरीतील मृत्युसंख्या चिंताजनक
2 नारायणगावातील तरुणांकडून करोना रुग्णांना मदतीचा हात
3 शववाहिका म्हणून शालेय बसचा वापर
Just Now!
X