महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. इंदापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
सोमनाथ विष्णू राऊत (वय २५, रा. शेटफळ, ता. इंदापूर), रणजित चांगदेव गुऱ्हाळकर (वय १९, रा. वकीलवस्ती, ता.इंदापूर), श्रीकांत नाना दोरकर (वय २०, रा. माळशिखरे वस्ती, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर गेल्या काही दिवसांत वाहनचालकांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. एक मे रोजी हिंगणगाव परिसरात ट्रकचालक कमरुद्दिन इमाम खान याला धमकावून रोकड, मोबाइल असा एक लाख बारा हजार रुपयांचा ऐवज सराईत चोरटे राऊत त्याचे साथीदार गुऱ्हाळकर आणि दोरकर यांनी लुटला होता. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले यांनी चोरटय़ांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सराईत चोरटय़ांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. राऊत याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने लूटमारीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून राऊत, गुऱ्हाळकर, दोरकर यांना पकडले.