News Flash

‘मोक्का’तून जामीन मिळालेला गुंड भाजपमध्ये

‘गुन्हेगारी पाश्र्वभूमी’ या एकमेव निकषावरच पक्षप्रवेश दिले जात आहेत की काय अशीही परिस्थिती दिसत आहे.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या विठ्ठल शेलार याचे मुळशी तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री, आमदार भेगडे यांच्या उपस्थितीत प्रवेश

भारतीय जनता पक्षामध्ये सध्या गुंडांना प्रवेश देण्याचे सत्र सुरू आहे. ‘गुन्हेगारी पाश्र्वभूमी’ या एकमेव निकषावरच पक्षप्रवेश दिले जात आहेत की काय अशीही परिस्थिती दिसत आहे. खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार याच्या टोळीविरोधात ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) सन २०१४ मध्ये कारवाई केली होती. चार महिन्यांपूर्वी शेलारला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुळशी तालुक्यात दहशत असलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या शेलारने गेल्या आठवडय़ात शुक्रवारी (३० डिसेंबर) पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला. पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शेलारला भोर-वेल्हा-मुळशी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे.

मुळशी तालुक्यातील उरवडे गावानजीक असलेल्या बोतरवाडीचा रहिवासी असलेला विठ्ठल शेलार (वय ३०) याने आठवडय़ापूर्वी भाजपप्रवेश केला. मुळशीतील भालवडी गावात पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम देखील झाला. त्या वेळी शेलार टोळीतील गुंड उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपच्या दृष्टीने ‘युवकांचे आशास्थान’ असलेल्या शेलारला भोर-वेल्हा-मुळशी या तीन तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याला युवा मोर्चाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. मान्यवरांसोबत काढलेली छायाचित्रे शेलारने फेसबुकवरही टाकली आहेत.

शेलारला पक्षप्रवेश दिल्यानंतर मुळशी तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. शेलारची मुळशी तालुक्यात मोठी दहशत आहे. शेलार टोळीबरोबरच मुळशीत गुंड शरद मोहोळ, गणेश मारणे, गजानन मारणे यांच्या टोळीची दहशत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुळशी तालुक्यातील जमिनी बांधकाम व्यावसायिकांकडून खरेदी केल्या जात आहेत. अनेक गृहप्रकल्पांचे काम भूगाव, पौड भागात सुरू आहे. स्थानिक गुंड टोळ्यांना हाताशी धरून जमीन खरेदी व्यवहार उरकले जातात. जमिनींना मोठय़ा प्रमाणावर भाव मिळत असल्यामुळे गुंड टोळ्या खरेदी-विक्री व्यवहारात उतरल्या आहेत. वर्चस्वाच्या वादातून यापूर्वी मुळशीत गुंडांचे खून झाले. तेथील टोळ्यांच्या दहशतीमुळे सामान्य माणूस तक्रार देखील करत नाहीत. बेकायदेशीर रीत्या जमिनींचा कब्जा घेण्याच्या प्रकारांमुळे टोळ्यांना मोठय़ा प्रमाणावर आर्थिक रसद मिळत आहे. मुंबईतील अनेक बडय़ा उद्योजकांची मुळशी, मावळ तालुक्यात मोठी गुंतवणूक आहे. तेथील टोळीयुद्धाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. या पाश्र्वभूमीवर शेलार याचा पक्षप्रवेश सोहळा म्हणजे गुंडाना राजकीय अभय देण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

माहिती घेऊन सांगतो – भेगडे

या संदर्भात भाजपचे मावळ जिल्हाध्यक्ष, आमदार बाळा भेगडे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुंड शेलार याच्या भाजप प्रवेशाबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन सांगतो, असे  सांगितले. त्यानंतर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

विठ्ठल शेलारची गुन्हेगारी कृत्ये

* २००९- डेक्कन भागात दरोडय़ाची तयारी

* २०१०- टोळीयुद्धातून पिंटू मारणेचा खून

* २०१२- प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांचे अपहरण, खून, मृतदेह जाळून टाकले

* २०१४- मुळशीत एकाचे खंडणीसाठी अपहरण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:42 am

Web Title: gangster get bail from mocca join bjp
Next Stories
1 पोलीस होण्याच्या इच्छेपोटी टोपी आणि बक्कल चोरले
2 जगताप-पानसरे यांचे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’
3 ‘डीआरडीओ’कडून तात्पुरता पूल तंत्र विकसित
Just Now!
X