News Flash

गुंड शरद मोहोळ याच्यासह सात जणांना जन्मठेप

न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  • टोळीयुद्धातून किशोर मारणे खूनप्रकरणी शिक्षा
  • कतिल सिद्धीकी खूनप्रकरणी मोहोळ आरोपी

मारणे टोळीचा गुंड किशोर मारणे याचा टोळीयुद्धातून गोळ्या घालून व कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी गुंड शरद मोहोळसह सात जणांना जन्मठेप व प्रत्येकी अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. दरम्यान, इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी कतिल सिद्धीकी याचा येरवडा कारागृहात खून प्रकरणातही मोहोळ आरोपी असून, हा खटला न्यायालयात सुरू आहे.

शरद हिरामण मोहोळ (वय ३०, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड), हेमंत पांडुरंग दाभेकर (वय ३०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरूड), दत्ता किसन गोळे (वय ३३, रा. पिरंगुट, मुळशी), योगेश भाऊ गुरव (वय २८, रा. कर्वेनगर), मुर्तझा ऊर्फ मुन्ना दावल शेख (वय ३२, रा. पौड रस्ता, काळेवाडी), अमित अनिल फाठक (वय २६, रा. कर्वेनगर, कोथरूड), दीपक गुलाब भातम्बेकर (वय २८, रा. दांडेकर पूल) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. रोहन चंद्रकांत धर्माधिकारी, अजय तुकाराम कडू, नवनाथ नारायण फाले व संदीप विश्वनाथ नाटेकर या आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. ११ जानेवारी २०१० रोजी मारणे याचा खून झाला होता. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मारणे व मोहोळ गुंड टोळ्यांमधील वादात संदीप मोहोळ याचा गणेश मारणे व टोळीने खून केला होता. या प्रकरणात गणेश मारणेला अटक झाल्यानंतर टोळीची सूत्र किशोर मारणे याच्याकडे आली होती.

संदीप मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ व साथीदारांनी कट रचला. किशोर मारणे हा नीलायम चित्रपटगृहात सिनेमा पाहायला येणार असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानुसार योजना आखण्यात आली. सिनेमा संपल्यानंतर किशोर मारणे हा जवळच असलेल्या एका मद्यालयात गेला. तेथे शरद मोहोळ व साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी मारणेवर गोळ्या झाडल्या व कोयत्याने तब्बल चाळीस वार केले.

न्यायालयात या प्रकरणामध्ये ३३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपींचे ‘मोबाईल लोकेशन’ घटनेच्या ठिकाणी असल्याचे व सीसीटीव्ही चित्रीकरणातही घटना कैद झाली होती, या गोष्टी खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.

शरद मोहोळ व साथीदारांनी निर्घृणपणे हा खून केला असून, आरोपींना जन्मठेप देण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने या प्रकरणात सात जणांना दोषी धरून तसे जाहीर केले. आरोपींना काही सांगायचे आहे का? अशी विचारणा केल्यानंतर, ‘आम्ही गुन्हा केला नाही, शिक्षा द्यायची असेल तर फाशीची द्या,’ असे हेमंत दाभेकर न्यायालयात म्हणाला. टोळीचा सूत्रधार शरद मोहोळ मात्र काही बोलला नाही.

त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास केला. तत्कालीन सहायक निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी आरोपींना पकडले होते.

कारागृहात खून आणि सरपंचपदाची हौसही

खून, खंडणी उकळणे, दरोडे, दहशत माजविण्याच्या गुन्ह्य़ात शरद मोहोळ टोळीचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. कारागृहात असतानाही मोहोळच्या नावाने खंडणी मागितल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकी (वय २७) याचा येरवडा कारागृहातील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यात मोहोळ याच्यासह त्याचा साथीदार अलोक भालेराव हे आरोपी आहेत. कारागृहात राहूनच मोहोळ याने मुळशी तालुक्यातील त्याच्या गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला होता. दहशतीमुळे त्याच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. मात्र, कालांतराने त्याने त्यातून लक्ष काढून घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 4:16 am

Web Title: gangster sharad mohol and six get life imprisonment
टॅग : Life Imprisonment
Next Stories
1 मोदी सरकारमध्ये सुशासन, लोकहिताला प्राधान्य
2 पुण्यातील सराफांचे दोन किलो सोने घेऊन कारागीर पसार
3 नटवर्य केशवराव दाते पुरस्कार मधू कांबीकर यांना जाहीर
Just Now!
X