04 March 2021

News Flash

विघ्नहर्त्यांची प्राणप्रतिष्ठा

घरोघरी भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली,

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या उत्सवामध्ये तमिळनाडूमधील महाबलीपूरम येथील शिवमंदिराची प्रतिकृती विवेक खटावकर यांनी साकारली आहे. या मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी झाले आणि विविध रंगी दिव्यांच्या प्रकाशात मंदिर असे उजळून निघाले.

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर्त्यां गणरायाचे ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात, मोठय़ा आनंदात आणि उत्साहात सोमवारी राज्यभर आगमन झाले. घरोघरी भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर सार्वजनिक मंडळांनी भव्य मिरवणुका काढून ‘श्रीं’ना उत्सवस्थानी नेले. चांगल्या पावसामुळे राज्याच्या बहुतेक भागातील दुष्काळ आणि पाणीटंचाई टळली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढला आहे.

औरंगाबादमध्ये जल्लोष

ढोलताशा आणि मोरया, मोरयाच्या गजरात औरंगाबादमध्ये ‘श्रीं’चे स्वागत मोठय़ा थाटामाटात आणि जल्लोषात करण्यात आले. या वर्षी पावसाचा चांगला जोर असल्याने गणेश उत्सवातील उत्साह द्विगुणित झाला आहे.  (पान ४ वर)

लातूरमध्ये  मुलींची कामगिरी सरस

लातूरमध्ये आपापल्या मंडळातील गणरायांचे स्वागत करण्यासाठी तरुणाई उत्सुक होती. ढोलताशाच्या गजरात सोमवारी सकाळपासूनच लातूरचे रस्ते गजबजून गेले होते. उत्सवात फेटे बांधून पथकांमध्ये सहभागी झालेल्या मुलींची कामगिरी मुलांपेक्षा काकणभर सरस असल्याचे दिसत होते.

ठिकठिकाणी ढोलताशा पथकांमध्ये मुलींची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

उस्मानाबादमध्ये जल्लोष

विघ्नहर्त्यां गणरायाचे सोमवारी ढोलताशाच्या गजरात मोठय़ा उत्साहाने उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात आगमन झाले. लाडक्या गणरायाची जिल्हाभरात वाद्यांच्या घोषात मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना विविध मंडळांनी केली. ढोलताशे, गुलालाची मुक्तपणे उधळण करीत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात मंडळांनी गणरायाची स्थापना केली.

कोल्हापुरात ‘सेल्फी’ स्पर्धा

कोल्हापूर शहरवासीयांना ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पध्रेत स्वत:चे छायाचित्र टिपण्याची संधी मिळाली आहे. कोल्हापूर शहरातील गणेशोत्सवाचे हे नावीन्य ठरले आहे. लाडक्या गणरायाचे आगमन कोल्हापूर शहरात सोमवारी वाजत गाजत झाले. सध्याची सेल्फीची आवड लक्षात घेऊन त्याला स्पध्रेचे स्वरूप आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशन आणि युवा सेनेच्या वतीने कोल्हापुरात देण्यात आले आहे.

पुण्यात वैशिष्टय़पूर्ण मिरवणुका

पुण्यनगरीतील वैभवशाली गणेशोत्सवाचा प्रारंभ सोमवारी पारंपरिक पद्धतीने झाला. गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा घरोघरी मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सुरू होता. मानाच्या मंडळांनी थाटामाटात काढलेल्या मिरवणुका हे मिरवणुकांचे वैशिष्टय़ ठरले. ढोलांच्या दणदणाटाला ताशांच्या कडकडाटाची साथ मिळाल्यामुळे शहरभर उत्सवी वातावरण तयार झाले. मानाच्या मंडळांच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मुहूर्तावर करण्यात आली. या मिरवणुकांच्या स्वागतासाठी रंगावलीच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. तसेच मिरवणुकांमधील फुलांचे रथही लक्षवेधी ठरले होते. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरू होत्या. मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा उत्सव मंडपांमध्ये लागल्या होत्या. गणरायाला नारळाचे तोरण अर्पण करण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 2:48 am

Web Title: ganpati celebration
Next Stories
1 उद्योगनगरीत गणरायाचे जोरदार स्वागत
2 पोलिसांवरील हल्लयांबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार – डॉ.नीलम गोऱ्हे
3 चैतन्याच्या लाटेवर सुखकर्त्यांचे आगमन
Just Now!
X