ढोल-ताशांचे पथक, फुलांची उधळण अन् आकर्षक मिरवणुका
कष्टकऱ्यांची, कामगारांची व उद्योगांच्या िपपरी-चिंचवड नगरीत सोमवारी गणरायाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचे पथक, फुलांची उधळण, शालेय पथके तसेच जंगी मिरवणुका काढतानाच ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत पारंपरिक पध्दतीने गणरायाच्या मूर्ती आणून उशिरापर्यंत प्रतिष्ठापना करण्याचे काम सुरू होते. सकाळपासून अवघे शहर गणेशमय झाले होते, तर प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
गणेशचतुर्थीला सकाळपासूनच शहरभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. िपपरी, चिंचवड, निगडीतील बाजारपेठा तसेच प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत होती. बच्चे कंपनीचा उत्साह सर्वाधिक होता. प्रारंभी घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत होती. त्यादृष्टीने सकाळपासूनच गणेशमूर्तीसोबतच पूजेचे व घरगुती सजावटीचे साहित्य खरेदी करण्याची लगबग होती. घरगुती गणपतींसाठी अनेकांनी आकर्षक सजावटी केल्याचे दिसून येत होते. दुपारनंतर, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणपती आणण्यास सुरूवात केली. आकर्षक मिरवणुका, फुलांनी सजवलेले रथ आणि कार्यकर्त्यांमध्ये सळसळता उत्साह हे या मिरवणुकांचे वैशिष्टय़ होते. महिलांचा लक्षणीय सहभाग होता. सायंकाळी मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. उशिरापर्यंत मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना सुरू होती. पहिल्याच दिवसापासून देखावे सुरू करण्याचा अनेक मंडळांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांची धावपळ होती. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यादृष्टीने मंडळांना पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना दिल्या जात होत्या. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने घाट पाहणी तसेच विसर्जनाची, निर्माल्याची व्यवस्था तपासून पाहिली जात होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 2:46 am