सकाळपासूनच भाविकांची गर्दी
विविध गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी करीत रविवारची सुट्टी सत्कारणी लावली. गणेश मंडळांच्या कमानी, रस्त्यांवरच मांडलेले खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि फेरीवाल्यांची दुकाने अशा बिकट अवस्थेतून वाट काढत पायी चालणे मुश्कील झाले होते. गणेशभक्तांची उच्चांकी गर्दी रस्त्यावर आल्यामुळे शहराच्या मध्य भागात कोंडी झाली होती.
शहराच्या मध्य भागाला रविवारी जत्रेचे स्वरूप आले होते. पोलीस, गृहरक्षक दलाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस, पोलीस मित्र आणि मंडळाचे कार्यकर्ते वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी खबरदारी घेत होते. देखावे पाहण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. मनोऱ्यांवरून पोलीस दुर्बिणीसह लक्ष ठेवून होते. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत होत्या. शहराच्या मध्यभागात गर्दी झाल्याने अनेकांनी गाडय़ा दूरवर लावून पायी जात देखावे पाहणे पसंत केले. ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यास रात्री बारापर्यंत परवानगी असल्याने नागरिकांनी अधिकाधिक मंडळांचे देखावे पाहण्यावर भर दिला. मध्यरात्रीनंतर मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.
ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक, सामाजिक देखावे पाहण्यासाठी झालेली गर्दी, संगीताच्या तालावर नर्तन करणारी विद्युत रोषणाई पाहताना गणेशभक्तांचे देहभान हरपून गेले. थकलेल्या पावलांनी भाविकांनी उपाहारगृहांमध्ये जाऊन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊन गणेश दर्शनाचा आनंद द्विगुणीत केला. चौकाचौकात झालेली प्रचंड वाहतूक कोंडी, विसर्जनासाठी तयार होत असलेले ट्रॅक्टर-ट्रक आणि गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी झालेली गर्दी यांमुळे रविवारी शहराच्या मध्य भागात प्रचंड गर्दी झाली होती. नारायण, सदाशिव, कसबा पेठ, कुमठेकर, टिळक, केळकर, बाजीराव, शिवाजी रस्ता, शनिवार वाडा, मंडई परिसर आदी विविध ठिकाणी मानाच्या गणपतींबरोबरच इतर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळाची विद्युत रोषणाई, छत्रपती राजाराम मंडळाची जेजुरी मंदिराची प्रतिकृती, विश्रामबाग मंडळाचा रावणवध, मुंजाबाचा बोळ मित्र मंडळाचे देखावे पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. नातूवाडा मंडळ, जयहिंद मित्र मंडळ आणि शनिवार पेठ मेहूणपुरा मंडळाने वैज्ञानिक देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली असून हे देखावे पाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. शिवाजी रस्त्यावर वसंत चित्रपटगृह, बुधवार चौक, दगडुशेठ आदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी पोलिस, होमगार्ड यांच्याकडून वीस ते तीस फुटांवर दहा मिनिटांच्या कालावधीने दोरी लावून लोकांना थांबविले जात होते. पुढील गर्दी कमी झाल्यानंतर पुन्हा लोकांना सोडले जात होते. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहत होती.
गणेश मंडळांची सजावट पाहण्यासाठी उपनगर आणि परगावहून आलेल्या महिलांना स्वच्छतागृहे नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागले. बेलबाग चौकातील सिटी पोस्ट कार्यालयाजवळील मागील महिला स्वच्छतागृहाबाहेर महिलांची एकच गर्दी झाली होती. या व्यतिरिक्त स्वच्छतागृहांची वानवा आणि अस्वच्छ असल्याने महिलांची मोठी गैरसोय झाली. महिला पोलिसांनी देखील गणेशोत्सवानिमित्त डय़ुटी असल्याने शहराच्या मध्यभागातील मोठी दुकाने, हॉटेल, लॉज आदी ठिकाणी स्वत:ची सोय केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 1:47 am