सात हजार पोलिसांसह उत्सवात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ सोमवारपासून (२ सप्टेंबर) होत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून उत्सवाच्या कालावधीत शहरात सात हजार पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. गणेशोत्सवासाठी बाहेरील शहरातून अतिरिक्त कुमक मागविण्यात येणार आहे.

पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरात नोंदणीकृत ३ हजार २४५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस आयुक्त डॉ.  के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

बेलबाग चौक, मंडई परिसरात मोठी गर्दी होते. या भागात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाइल लांबवण्याचे प्रकार होतात. मध्य भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्बशोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येणार आहेत. ध्वनिवर्धकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन मंडळांनी करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उत्सवाच्या कालावधीत अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील संवदेनशील तसेच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा (एसआरपीएफ) तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलातील जवान (होमगार्ड) मध्यभागात बंदोबस्तासाठी राहणार आहेत.

उत्सवात ‘सीवॉच’योजनेतील कॅमेऱ्यांची मदत

शहर तसेच उपनगरात सरकारकडून १२४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ‘सीवॉच या योजनेअंतर्गत शहरात खासगी सहभागातून तीस हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मध्य भागातील महत्त्वाच्या मंडळांच्या परिसरावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.