12 December 2017

News Flash

सातव्या दिवसाच्या विसर्जनाला १६ हजार किलो निर्माल्य गोळा!

गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदीत न टाकण्याबाबतची जनजागृती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे

प्रतिनिधी, पुणे | Updated: September 25, 2015 3:30 AM

गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदीत न टाकण्याबाबतची जनजागृती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी झालेल्या विसर्जन सोहळ्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नदीघाटांवर ५,५६१ गणपतींचे विसर्जन झाले. केवळ या एका दिवशी तब्बल १६,७०० किलो निर्माल्य संकलित झाले आहे.
‘स्वच्छ’ या संस्थेने ही माहिती पुरवली. संस्थेचे कचरावेचक आणि स्वयंसेवकांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २१ नदीघाटांवर बुधवारी दुपारी ३ ते रात्री ११ या वेळात निर्माल्य गोळा केले. एकूण नोंद झालेल्या ५,५६१ विसर्जित गणेशमूर्तीपैकी सर्वाधिक म्हणजे १,८३९ गणेशमूर्तीचे विसर्जन औंध गावातील नदीघाटावर झाले. सर्वाधिक निर्माल्य सांगवी घाटावर गोळा करण्यात आले असून त्याचे वजन ६,७५० किलो भरले.
या वर्षी भाविकांनी तुलनेने लहान आकाराच्या गणेशमूर्तीना प्राधान्य दिल्याचे मंगल पगारे यांनी सांगितले. गणेशमूर्ती लहान असल्यामुळे प्रत्येक मूर्तीबरोबर येणारे निर्माल्यही कमी होते, असेही त्या म्हणाल्या. परंतु बंड गार्डन येथील नदीघाटावर केवळ हौदातच गणपती विसर्जन शक्य असल्यामुळे तिथल्या अनेक नागरिकांनी येरवडा येथील चिमा घाटावर नदीत गणपती विसर्जन केल्याचे निरीक्षणही संस्थेतर्फे नोंदवण्यात आले.
पिंपरी- चिंचवडच्या कचरावेचक सुरेखा म्हस्के म्हणाल्या, ‘गेल्या वर्षीपर्यंत गणपतीच्या मूर्तीवरील हार व निर्माल्य गोळा करण्याचे काम आम्हाला स्वत:ला करू दिले जात नसे. या वर्षी मात्र अनेक जणांनी आम्हाला निर्माल्य गोळा करण्याची मुभा दिली. कचरावेचकांची समाजात असलेली प्रतिमा हळूहळू बदलत असल्याचे हे निदर्शक आहे.’
अनंत चतुर्दशीच्या दिवशीही (२७ सप्टेंबर) संस्थेतर्फे नदीघाटांवर निर्माल्य गोळा केले जाणार असल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले.

First Published on September 25, 2015 3:30 am

Web Title: ganpati nirmalay festival