गणेशोत्सव आठ दिवसांवर आल्यामुळे आता उत्सवासाठी मंडप उभारण्याची मंडळांची घाई सुरू आहे. भर रस्त्यात मांडव उभे करण्यात आल्यामुळे येता महिना हा वाहतूक कोंडीचा असणार आहे. ‘वाहतुकीला किंवा पादचाऱ्यांना अडचण होईल, असे मांडव उभारण्यात येऊ नयेत,’ या उच्च न्यायालयाच्या आदेशांकडेही दुर्लक्षच करण्यात येत आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अजून आठ दिवस आहेत. गणेशोत्सवासाठी मांडव उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, त्यामुळे आतापासूनच शहरातील अनेक रस्ते, चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र आणि नंतर काही भागांमध्ये फटाक्याच्या विक्रीचे मंडप.. यांमुळे पुढील किमान महिनाभर वाहतूक कोंडीचा असणार आहे.
सर्वाधिक दाटीवाटीचा शहरातील मुख्य भाग असो किंवा बाजूने वाढत गेलेली उपनगरे सगळीकडेच उत्सवाच्या मंडपांनी रस्ते व्यापण्यास सुरुवात केली आहे. ‘रस्त्यावरील वाहतुकीला किंवा पादचाऱ्यांना अडचण होणार नाही,’ असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. मात्र, त्याची कोणत्याही प्रकारे पत्रास न बाळगता रस्ते अडवूनच मंडपांची उभारणी सुरू आहे. शहरातील अनेक मोठी, प्रतिष्ठित मंडळे यांतही आघाडीवर आहेत. गोकुळाष्टमीसाठी उभारलेले बहुतेक मांडव अजून हललेलेच नाहीत. त्यातच गणेश मूर्तीच्या विक्रीसाठी उभारण्यात आलेले मांडव आणि आता त्यात गणेशोत्सवासाठीच्या मंडपांची भर पडली आहे. अनेक भागांमध्ये दोन मंडळांच्या मध्ये एका चौकाचेही अंतर नाही. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला एका मंडळाचा मंडप आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मंडळाचा मंडप अशी परिस्थिती दिसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांत, बाजारपेठांमध्येही भलेमोठे मंडप भर रस्त्यातच उभे करण्यात येत आहेत. उपनगरांमध्ये मंडपांच्या विस्तारावर असलेल्या मर्यादाही पाळण्यात आलेल्या नाहीत. त्यातच सध्या रस्त्यांच्या कडेला पडलेले मंडप उभारण्याचे सामानही वाहतूक कोंडीत भर घालत आहे.

चालायला जागाच नाही
मंडपांनी व्यापलेल्या या रस्त्यांवर सध्या सर्वाधिक हाल पादचाऱ्यांचे होत आहेत. अर्धा पदपथ आणि अर्धा रस्ता वापरून मंडप उभे केले जातात. उरलेल्या रस्त्यावर बससारखी मोठी वाहनेही असतात. त्यामुळे शहरांतील अनेक रस्त्यांवर चालण्यासाठी पादचाऱ्यांना कसरतच करावी लागत आहे.