लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आज राज्यभरातील घाटांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचेही विसर्जन मंगळवारी करण्यात येत होते. भाविक गणेशमूर्तींचे हौदामध्ये तर काहीजण नदीमध्ये, मुंबईतील लोक समुद्राच्या पाण्यात विसर्जन करत होते. याशिवाय काहींनी घरातच गणपतींचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. याशिवाय अनेकांनी गणेशमूर्ती दान करण्यालाही पसंती दिली.

पिंपरी-चिंचवडमधील मोरया घाटावर नेहमी प्रमाणे होडीमधून जाऊन गणपती बाप्पाचं नदीत विसर्जन करण्यात येत होते. यावेळी घाटावर गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मात्र जलप्रदूषण होऊ नये यासाठी काही सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन मूर्तीदानाचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये गणेश भक्तांनी संस्कार ग्रुपला सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल ३० हजार मूर्ती दान केल्या. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी मूर्तीदानाला मोठा प्रतिसाद दिला.

आज सकाळी आठ वाजल्यापसून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. रात्रीपर्यंत हा मूर्तीदानाचा आकडा ५० हजारांपेक्षा जास्त होईल असा अंदाज संस्कार ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वर्तवला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्या पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे मूर्तीची दुरावस्था होते. त्याचबरोबर जलप्रदूषण देखील मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठीच मूर्तीदान हा उपक्रम राबविला जात आहे. जेणेकरून अशा प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या एकत्र करून पारंपरिक पध्दतीने विशेष ठिकाणी विसर्जित केल्या जातात. गणपती मूर्तीदानाच्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा  प्रतिसाद मिळत असून यात १०० टक्के घरगुती गणपतींचा समावेश आहे. हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात राबवला जात आहे.