कलावंतांना व्यासपीठ मिळते. कलाजीवनात लोकमान्यता मिळते आणि त्यांचा गौरवही होतो. ही शिदोरी घेऊन ते आयुष्यात आणखी पुढे जात असतात. पण, त्यांच्यामागे पडद्यामागील कलावंत सातत्याने उभे असतात. असे कलाकारांना मोठे करणाऱ्या धर्माधिकारी यांचे कार्य अलौकिक आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.
गानवर्धन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते ‘संगीत संवर्धक’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना-गुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, कुमुद धर्माधिकारी आणि माजी आमदार उल्हास पवार या वेळी उपस्थित होते.
डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, धर्माधिकारी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘गानवर्धन’ नावाचे छोटेसे रोपटे लावले. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा ध्यास असलेले हे रोपटे आता चांगलेच बहरले आहे. संगीताचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था कमी आहेत. गानवर्धन संस्थेमागे धर्माधिकारी यांची दूरदृष्टी दिसते.
धर्माधिकारी म्हणाले, जीवनाच्या वाटचालीत अनेक दिग्गज कलाकारांना पाहता आणि ऐकता आले. त्यामुळे आयुष्याचे सोने झाले. हा सोहळा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे. अभिजात संगीताच्या प्रोत्साहनाचे कार्य कलाकार आणि रसिकांच्या पाठिंब्याने असेच सुरू राहील.
शंकर अभ्यंकर म्हणाले, गानवर्धन संस्थेने गायन, वादन, नर्तन, कीर्तन कलेतील अनेक कलाकारांना प्रकाशझोतात आणले. त्यासाठी पडद्यामागे राहणाऱ्या धर्माधिकारी यांचे कार्य मोठे आहे. या वेळी उस्ताद उस्मान खाँ, डॉ. सुचेता भिडे-चापेकर, उल्हास पवार, धनंजय परांजपे, डॉ. भास्कर हर्षे, निवेदक सुधीर गाडगीळ, स्मरणिकेचे संपादक प्रसाद भडसावळे यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तरार्धात प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर यांच्या गायनाची मैफल झाली. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची आणि भरत कामत यांनी तबल्याची साथसंगत केली. प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले.