पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांना शुक्रवारी कचरावेचक महिलांकडून देण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या भेटीचा सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. या महिलांनी आयुक्तांना नागरिकांकडून गोळा केलेल्या जुन्या शर्टांपैकी दोन शर्ट भेट म्हणून दिले. थोड्यावेळासाठी सर्वचजण या प्रकाराने अवाक झाले होते. मात्र, त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी ही भेट स्विकारत आपण हे कपडे नक्की वापरणार असल्याचे सांगितले.

पुणे शहारातील स्वच्छ, कागद,काच, पत्रा या संस्था आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा घरोघरी जाऊन उचलला जातो. या संस्थेमार्फत जुने कपडे देण्याचे आवाहनही नागरिकांना केले जाते.त्याला नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. सध्या या संस्थाकडे  ४० टनापेक्षा जास्त जुने कपडे जमा झाले असून काही नाममात्र पैसे घेऊन त्याची विक्री केली जाते. आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी कचरा प्रश्नावर अधिकारी वर्गाची बैठक घेतली. यावेळी स्वच्छ, कागद,काच,पत्रा या संस्थेच्या सुप्रिया भडकवाड यांनी नागरिकांकडून मिळालेले २ जुने शर्ट भेट दिले.

याविषयी सुप्रिया भडकवाड म्हणाल्या की, शहरातील विविध भागात आम्ही जाऊन कचरा गोळा करतो.त्यावेळी नागरिकांना जुने कपडे देण्याचे आवाहन करतो. त्याला नागरिक चांगला प्रतिसाद देतात. या कपड्याचा नागरिक वापरदेखील करतात. इतर नागरिक ज्याप्रकारे वापरलेले कपडे घेतात त्याप्रमाणेच महापालिका आयुक्तांना हे कपडे देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये या उपक्रमाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, हाच आमच्या भेटीमागचा मुख्य उद्देश असल्याचे सुप्रिया भडकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, आयुक्त कुणाल कुमार यांनी ही भेट स्विकारत आपण हे कपडे परिधानदेखील करणार असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमध्ये अधिकधिक नागरिकांनी सहभागी होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.