नववर्षांचे स्वागत करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाने यंदा आगळा उपक्रम आखला असून सर्व शाळांमध्ये व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवून तसेच वापरात नसलेले जुने साहित्य बाहेर काढून आणि प्रत्येक शाळेत वृक्षारोपण करून नववर्षांचे स्वागत केले जाणार आहे.
शिक्षण मंडळाच्या या उपक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल. या उपक्रमाचा प्रारंभ सोमवार (१६ डिसेंबर) पासून होत असून १६ ते २२ डिसेंबर दरम्यान सर्व शाळांच्या इमारतींमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी शनिवारी सांगितले. शाळांच्या इमारतींमधील स्वच्छतेबरोबरच शाळांमधील सर्व जुने, अडगळीचे व दुरुस्त न होऊ शकणारे साहित्य काढून टाकले जाईल. शालेय परिसराच्या स्वच्छतेचेही नियोजन करण्यात आल्याचे चौधरी म्हणाले.
ही मोहीम सुरू असताना पाचवी ते सातवी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना रुबेला लस देण्याचीही योजना आहे. तसेच पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व विनामूल्य चष्मे वाटप असाही कार्यक्रम होणार आहे. शाळांमधील विविध असुविधा दूर करून आवश्यक कामे क्षेत्रीय कार्यालयांमार्फत करण्याचे नियोजन आहे. तसेच या कामांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याचीही योजना आहे.
शाळांमधील स्वच्छतेबरोबरच प्रत्येक शाळेच्या आवारात दहा ते वीस झाडे लावण्याचा संकल्प असून प्रत्येक शाळेत सर्वागीण शैक्षणिक प्रगतीचाही संकल्प केला जाणार असल्याचे चौधरी म्हणाले. स्वागत नववर्ष-२०१४ या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळातर्फे महापालिकेचे अधिकारी, तसेच मुख्याध्यापक, कर्मचारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व कार्यक्रम निश्चित करण्यात आले.