कचरा वेचक महिलेच्या मुलीने इयत्ता दहावीत घवघवीत यश संपादन केलं असून ७१.४१ टक्के गुण मिळवले आहेत. वैष्णवी मारुती सोनटक्के असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. आई मंदा ही महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी कचरावेचक म्हणून काम करते. त्यामुळे मिळणारा पगार तुटपुंजा असून वडील मारुती सोनटक्के हे बिगारी काम करतात. हे दोघे दोन मुलीचं शिक्षण करत असून मुलीला पोलीस अधिकारी बनवायचं आहे.

वैष्णवी मारुती सोनटक्के ही पिंपरी मधील नव महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. वैष्णवीने ७१.४१ टक्के गुण मिळवल्याने आई वडिलांना तिचा गर्व असल्याचे त्यांनी सांगितले. आई मंदा या सकाळी पाऊणे सातच्या सुमारास घरातून बाहेर पडतात आणि कामाला जातात. त्या शहराच्या गल्लोगल्ली जाऊन घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा जमा करतात. त्यांना महिन्याकाठी ७ तर कधी ८ हजार रुपये मिळतात.

या सर्व परिस्थितीत त्या आपल्या दोन्ही मुलींचं शिक्षण पूर्ण करत असून वैष्णवीला दहावीत चांगलं यश मिळाल्याबद्दल त्या खूप आनंदी आहेत. दिवसरात्र अभ्यास करून मिळालेल्या यशामुळे वैष्णवीने आपल्या आईवडिलांचं नाव उज्वल केलं आहे. वैष्णवीला भविष्यात पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा आहे. चांगलं काम करायचं आहे, भ्रष्टाचार मुक्त खातं करायचं असल्याचं ती म्हणाली. तसेच यासाठी कठोर परिश्रम घेणार आहे. वैष्णवीने आई वडिलांना समजून घेतले. आपल्या परिस्थितीचा तिने अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही, असं आई मंदा म्हणाल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात तिला शिक्षणात काही कमी पडू देणार नाहीत असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.