बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

नियोजनशून्य कारभारामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांचे पुरते वाटोळे झाले आहे. आता उद्यानांमधील समस्यांची पाहणी करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यापूर्वी अनेकदा पाहणी दौरे झाले, अहवाल झाले. त्याचा काहीही उपयोग झाल्याचे ऐकिवात नाही. आता सर्वेक्षणाच्या नावाखाली पुन्हा कागदी घोडे नाचवले जातील. उद्यान विभागातील संगनमताने होणारी वाटमारी शोधून त्याला पायबंद घातला तरी पुरेसे ठरेल.

पिंपरी महापालिकेचा उद्यान विभाग पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहिला आहे. खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे करत उद्यानांची निर्मिती करायची आणि त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करायचे, असाच कारभार आतापर्यंत सुरू आहे. उद्यान विभागाचे अधिकारी आणि उद्यानविषयक कामे करणारे ठेकेदार यांच्यात आर्थिक लागेबांधे आहेत. तसेच, मोठय़ा ठेकेदारांची बडय़ा अधिकाऱ्यांशी छुपी भागिदारी आहे, हे उघड गुपित आहे. महापालिकेत सत्ता कोणाचीही असो, त्याच त्या ठेकेदाराचा मक्ता वर्षांनुवर्षे सुरूच आहे. क्षमता नसलेले अधिकारी आणि संगनमताने होणाऱ्या ‘उद्योगां’मुळे उद्यान विभागाचे व्हायचे तेवढे वाटोळे झालेले आहे. टक्केवारीच्या मलिद्याची काही गणिते नसतील असे शहरातील एकही उद्यान असे नसेल असे उघडपणे बोलले जाते.

शहरात १७८ उद्याने आहेत. त्यातील बहुतांश उद्यानांमध्ये समस्यांची जंत्री आहे. उद्यानांमध्ये झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. उद्यानांचे पदपथ बरोबर नाहीत. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसते. स्वच्छतागृहे सदैव तुंबलेली असतात. खेळणी मोडकळीस आलेली आहेत. जिकडे-तिकडे अस्वच्छता दिसून येते. प्रेमीयुगुलांचे चाळे सुरू असतात. बाहेरच्या टोळक्यांचा उच्छाद असतो. सुरक्षिततेच्या नावाने कायम ओरड असते. मात्र, यापैकी कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात समन्वय नाही. सर्वाचा नवनव्या उद्यानांच्या निर्मितीवर आणि त्यासाठी अवाढव्य खर्च करण्यावर भर असतो. उद्घाटन होईपर्यंत सगळे मिरवत असतात. नंतर उद्यानांच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.

उद्यान विभागाला पुरेसे अधिकार नाहीत. पर्यायाने त्यांना महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठा या विभागांवर अवलंबून राहावे लागते. या विभागांचा एकमेकांशी समन्वय नसतो. मोठी जबाबदारी असलेल्या स्थापत्य अधिकाऱ्यांना मोठय़ा कामांमध्ये रस असतो. छोटी आणि ज्यातून त्यांना काही लाभ मिळणार नसेल, अशी कामे ते करतच नाहीत. विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या मुजोरपणाचा अनुभव उद्यान विभागात अनेकांनी घेतला आहे. उद्यानांमधील स्वच्छता राखली जात नाही. स्वच्छता अभियानापुरती स्वच्छता केली जाते. नंतर, त्याकडे कोणी पाहात नाही.

एकूणात सगळाच सावळा गोंधळ आहे. अशा परिस्थितीत, शहरातील उद्यानांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. उद्यानांच्या सर्व समस्यांची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल ३१ मे पर्यंत दक्षता आणि गुणनियंत्रण विभागास सादर करण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत. सर्वेक्षण करणे चांगले आहे. तरीही अशा प्रकारची सर्वेक्षणे यापूर्वी झाली आहेत. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. केवळ वर्तमानपत्रांमध्ये नकारार्थी बातम्या छापून आल्या म्हणून उद्यानांचे सर्वेक्षण करून वेळकाढूपणा होणार असेल तर ती पळवाट ठरेल. असे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा थोडे खोलात जाऊन उद्यानांच्या दुरवस्थांचा विचार केला पाहिजे. त्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यरत असली पाहिजे.

तरुणाईला टिकटॉकचे वेड

उठता-बसता टिकटॉकवर व्हीडीओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे नको इतके वेड तरुणाईमध्ये दिसून येते. मध्यंतरी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या आवाजात व्हीडीओ तयार करण्याच्या प्रकाराने कहर केला होता. विशेष म्हणजे या प्रकारात मुलींचा सहभागही लक्षणीय होता. गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात टिकटॉक व्हीडीओचे प्रकार वाढले आहेत.

रहाटणीत दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हातात धारदार कोयता घेऊन टिक टॉक व्हीडीओ तयार करणाऱ्या उदयोन्मुख भाईच्या हातात पोलिसांच्या बेडय़ा पडल्या. ‘वाढीव दिसताय राव’ या गाण्यावर तो कोयता घेऊन घराबाहेर पडतो, असा हा टिकटॉक व्हीडीओ होता. तो सर्वत्र प्रसारित होताच पोलिसांनी त्याला शोधून काढला आणि बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला. रहाटणीचे हे प्रकरण ताजे असतानाच पिंपळे निलख येथील चार तरुणांनी हातात कोयते नाचवत टिकटॉक व्हिडिओ तयार केला. त्यातील दोनजण अल्पवयीन होते. इतर दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली.

शहरात टिकटॉकचा पहिला गुन्हा गेल्या नोव्हेंबरमध्ये दाखल झाला. चिखली येथे घरगुती वादात पत्नीने पतीच्या विरोधात एक टिकटॉक व्हीडीओ तयार केला होता. यावरून बरेच काही नाटय़ घडले होते. त्यापाठोपाठ, डिसेंबर महिन्यात दुसरा गुन्हा दाखल झाला. चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावर काही तरुण टिकटॉक व्हीडीओ तयार करत होते. त्यावेळी त्यांचा धिंगाणा सुरू होता. ऐनवेळी गस्तीचे पोलीस तेथे आले. त्यांनी या तरुणांना पोलीस ठाण्याची यात्रा घडवली होती. भोसरीतील एका शाळेत टिकटॉकद्वारे मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला होता. टिकटॉकचे वेड धोकादायक ठरू शकते. पोलिसांनी या विरोधात कारवाईची भूमिका घेतली आहे.  कठोर कारवाईशिवाय या प्रकाराला पायबंद बसणार नाही.