चिकनची टनावारी विक्री; मटण, मासळीवर ताव

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी मासळी बाजारात मोठी उलाढाल झाली. सामिष खवय्यांकडून मासळी, चिकन, मटणाला मोठी मागणी राहिली. हजारो किलो मासळी, मटण आणि चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांकडून गटारी अमावास्या साजरी करण्यात आली.

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी अनेक जण सामिष पदार्थाचे भोजन करतात. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात सामिष पदार्थाचे सेवन वज्र्य मानले जाते. त्यामुळे आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला मोठी मागणी असते. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवसाला खवय्ये गटारी अमावास्या म्हणतात. आषाढ महिन्यातील अमावास्या शुक्रवारी (१० ऑगस्ट) सुरू झाली. शनिवारी (११ ऑगस्ट) दुपापर्यंत अमावास्या आहे. शनिवारी खवय्ये सामिष पदार्थाचे सेवन करत नाहीत. तसेच दीपपूजा असल्याने सामिष पदार्थाना विशेष मागणी नसते. रविवारपासून (१२ ऑगस्ट) श्रावण महिन्याचा प्रारंभ होत असल्याने सामिष खवय्यांकडून शुक्रवारी गटारी साजरी करण्यात आली.

गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण मार्केट, पौड फाटा येथील मासळी बाजार, लष्कर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट येथील बाजारात शुक्रवारी सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, मासळी बाजारात शुक्रवारी दहा ते बारा टन मासळीची आवक झाली. पाऊस ओसरल्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात आवक सुरू झाली आहे. रत्नागिरी, अलिबाग, वसई, गुजरात परिसरातून मासळीची शुक्रवारी आवक झाली. घरगुती ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला मोठी मागणी राहिली.

चिकनला मागणी चांगली राहिली. पुणे जिल्हय़ातील कुक्कटपालन करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून जिवंत कोंबडय़ांची मोठी आवक झाली. शुक्रवारी बाजारात चारशे ते साडेचारशे टन चिकनची विक्री झाली. चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती शीतल अ‍ॅग्रोचे रूपेश परदेशी यांनी दिली.

मटण विक्रेता दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी (५ ऑगस्ट) मटणाला मोठी मागणी राहिली. शुक्रवारी आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असल्याने बाजारात मोठी उलाढाल झाली. घरगुती ग्राहक, केटरिंग व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी राहिली. साधारणपणे बाजारात दीड ते दोन टन मटणाची विक्री झाली.