चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार आणि वयोवृद्ध कलाकारांचे आश्रयस्थान असा लौकिक असलेल्या ‘पूना गेस्ट हाउस’ या वास्तूमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोमवारी स्नेहबंधाचा मेळावा रंगला. एरवी सर्वाचे आपुलकीने स्वागत करणारे चारुकाका सरपोतदार खुर्चीवर शांतपणे बसून आपल्याविषयी कौतुकाचे बोल ऐकताना अवघडले होते. ‘चारुकाकांकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत वयालाही होणार नाही,’ अशा समर्पक शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केलेल्या भावनांमधून चारुदत्त सरपोतदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला.
चित्रपटसृष्टीतील मोहमयी जगामध्ये वावरताना प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेले आणि भालजी पेंढारकर यांच्या तालमीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या चारुदत्त सरपोतदार यांनी सोमवारी वयाची ८६ वर्षे पूर्ण केली. हे औचित्य साधून संवाद पुणे संस्थेतर्फे या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते चारुकाकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आशा काळे, मधू कांबीकर, प्रतिभा शाहू मोडक, डॉ. माधवी वैद्य, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, हॉटेल व्यावसायिक जगन्नाथ शेट्टी, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, श्रीधर कुलकर्णी, अप्पा कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.
दादासाहेब फाळके यांच्यापासून ते दादा कोंडके यांच्यापर्यंत आणि ग. दि. माडगूळकरांपासून ते जगदीश खेबुडकरांपर्यंत चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकारांनी या वास्तूला भेट दिली असून चारुकाकांचे आदरातिथ्य अनुभवले आहे. माणसे जोडण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. चारुकाका हिंदूुत्ववादी आणि मी काँग्रेसवाला असे असलो तरी भालजींच्या जयप्रभा स्टुडिओतील कार्यकर्ते हा आमच्या स्नेहातील दुवा असल्याचे रामदास फुटाणे यांनी सांगितले. चारुकाका माणसे जोडतात. त्यासाठी वेल्डिंग करतात. पण, ठिणग्या पेटल्याशिवाय जोडले जात नाही हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते ठिणग्या पेटवत असले तरी माणसे दुखावत नाहीत, असे राजदत्त यांनी सांगितले. चारुकाका हा सद्प्रवृत्तीचा पाईक असून माणसे लोभाने कशी जोडावीत याचे उदाहरण म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागेल, असे श्रीकांत मोघे यांनी सांगितले.
किशोर आणि अभय हे पुत्र, साधना आणि शर्मिला या सुना यांच्यासह चारुकाकांच्या नातवंडांनी सर्वाचे स्वागत केले. प्रत्येकाला न्याहरी मिळाली की नाही याची दक्षता त्यांनी घेतली. खरं तर, हे ‘हाउस’ तुमचे आहे आणि आम्ही सरपोतदार येथील ‘गेस्ट’ आहोत, अशा शब्दांत साधना सरपोतदार यांनी आभार मानले.

जेव्हा गाडगिळांची फिरकी घेतली जाते
खासगी मैफलीमध्ये ओघवत्या शैलीत गप्पा मारणारे चारुकाका औपचारिक कार्यक्रमात बोलताना अवघडतात. हे ध्यानात घेऊन सुधीर गाडगीळ यांनी काही प्रश्न विचारून त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. ‘इतके अभिनेते पाहिलेत. पण, तुम्हाला आवडलेला अभिनेता कोण?’ या प्रश्नावर चारुकांकांनी क्षणार्धात ‘तूच’ असे उत्तर देत गाडगीळ यांची फिरकी घेतली. आवडती अभिनेत्री असे विचारले तेव्हा ‘अर्थातच सुलोचनादीदी’ असे त्यांनी सांगितले. राजा परांजपे यांचे ‘पेडगावचे शहाणे’ आणि ‘हा माझा मार्ग एकला’ हे माझे आवडते चित्रपट असल्याचे चारुकाकांनी सांगितले.