गौरी सावंत यांची वेदना

देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत अशी भावना पांढरपेशा महिला व्यक्त करतात. मात्र, प्रत्यक्षात सहा महिन्यांच्या मुलीपासून ७० वर्षांच्या वृद्धेपर्यंत कोणतीही महिला सुरक्षित नाही. महिलांवर अत्याचार झाले तर कँडल मार्च काढणे किंवा ब्लॉग लिहून व्यक्त होणे मला जमत नाही. मात्र मुलीची आई म्हणून सध्याचे वास्तव भयभीत करणारे असल्याची वेदना तृतीयपंथीयांच्या हक्क्कांसाठी लढणाऱ्या आणि दत्तक प्रक्रियेतून एका मुलीचे मातृत्व स्वीकारलेल्या गौरी सावंत यांनी रविवारी व्यक्त केली.

जागतिक मातृत्व दिनानिमित्त ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ संस्थेतर्फे ‘गौरी सावंत – द एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टोरी ऑफ द ट्रान्सजेंडर मदर’ या कार्यक्रमात गौरी सावंत यांच्याशी संगीता शेटय़े यांनी संवाद साधला. संस्थेचे रिदम वाघोलीकर, आशय वाघोलीकर, गौरी सावंत यांच्या कन्या आणि भावी जावई उपस्थित होते.

गौरी म्हणाल्या, भवानी पेठेत एका सामान्य मध्यमवर्गीय घरात मुलगा म्हणून मी जन्माला आले. वय वाढत गेले तशी आपण मुलगा नाही ही जाणीव बळकट होत गेली. मात्र, हे वास्तव स्वीकारायला कुटुंबीय तयार होत नव्हते. शेवटी मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. अर्धपोटी राहिले, भीक मागितली, तेव्हा विठूमाउली माझी आई झाली. महाराष्ट्र पुरागामी आहे असे म्हटले जाते मात्र आजही येथे तृतीयपंथीयांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ (वेल्फेअर बोर्ड) असले पाहिजे.

आपल्या संस्कृतीत एका बाजूला कन्यापूजन केले जाते. महिला दिन, मातृत्व दिन साजरा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच्या कचराकुंडय़ांमध्ये लहान मुली सापडतात. अशा सर्व मुलींच्या पालनपोषणासाठी मी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे. त्या मुली मोठय़ा शिक्षित होऊन दीक्षांत कार्यक्रमात आई म्हणून माझे नाव घेतील तो माझ्यासाठी खरा मातृदिन असेल, अशी भावना गौरी सावंत यांनी व्यक्त केली.