वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस पुरेशा वेळेत मिळाली नसल्याचा आक्षेप घेतल्यामुळे कोणतेही कामकाज न होता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची सभा बरखास्त करण्यात आली. सुधारित कार्यक्रमानुसार १७ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
संस्थेच्या घटना दुरुस्तीचा मसुदा, वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल ही कागदपत्रे वेळेत न मिळाल्याची लेखी तक्रार संस्थेच्या काही आजीव सभासदांनी यापूर्वीच केली होती. संस्थेचे अध्यक्ष अॅड. नंदू फडके यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संस्थेच्या घटनेनुसार किमान २१ दिवस ही कागदपत्रे आजीव सभासदांना मिळणे अपेक्षित असताना त्यासाठी विलंब झाला आहे हे निदर्शनास आणून देत ही सभा बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात फडके यांनी मानद सचिव आणि कार्यालयीन कामकाज पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभासदांच्या भावनांचा आदर करीत ही सभा बरखास्त झाली.