पारपत्र काढण्यासाठी पारपत्र खात्याची भेटीची वेळ आता आणखी लवकर मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक पारपत्र खात्यातर्फे मे आणि जूनमध्ये शिवाजीनगरजवळ पारपत्र महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यात रोज ६०० अर्जदारांना पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळेल.
प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी पारपत्र काढण्यासाठीचा महामेळावा औंधमध्ये घेण्यात आला होता. त्या मेळाव्यात तब्बल ३२ हजार नागरिकांनी पारपत्रे काढली. या वर्षीचा मेळावाही दोन महिन्यांचा असून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून त्याची सुरुवात होईल. विशेष म्हणजे हा मेळावा औंध किंवा मुंढव्याला नसून शिवाजीनगर येथे होणार असल्याने शहरातील नागरिकांसाठी ते ठिकाण अधिक सोईचे ठरू शकेल.
महामेळाव्यात प्रथम एका दिवशी १०० पारपत्र अर्जदारांना भेटीच्या वेळा दिल्या जातील. हे प्रमाण हळूहळू वाढत दर दिवशी ६०० जणांना सेवा दिली जाईल, असे गोतसुर्वे यांनी स्पष्ट केले. मेळाव्यासाठी भेटीच्या वेळा घेण्याच्या तारखांबाबतचा तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी हज यात्रा करू इच्छिणाऱ्यांनी
आतापासूनच पारपत्रासाठी अर्ज करावेत
हज यात्रेस जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांकडे मशीनद्वारे वाचता येण्याजोगी पारपत्रे असणे आवश्यक असते. तसेच २०१७ मध्ये या यात्रेस जाणाऱ्यांच्या पारपत्राची मुदत अंदाजे एप्रिल २०१८ पर्यंतची असणे अपेक्षित आहे. ‘शेवटच्या क्षणाला पारपत्रासाठी अर्ज केल्यामुळे यात्रेकरूंचा वैताग होण्याबरोबरच पारपत्र खात्यावरही एकदम भार पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरमधील हाज यात्रेस जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आतापासूनच पारपत्रांसाठी अर्ज करण्यास सुरुवात करावी,’ अशी सूचना गोतसुर्वे यांनी केली.