राज्यातील करोनाबाधितांच्या नमुन्यांचे तीन महिने जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिगे्रटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) या संस्थेसह सामंजस्य करार करून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातील २५ नमुने याप्रमाणे तीन महिने परीक्षण करण्यात येणार आहे.

राज्यात फेब्रुवारीपासून करोना संसर्ग वाढल्यानंतर यवतमाळ आणि अमरावती येथील रुग्णांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात करोना विषाणूचे उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्याचे आढळून आले. नव्या उत्परिवर्तनासाठी केरळने ‘आयजीआयबी’ या संस्थेसह केलेल्या अभ्यासाचा अहवाल राज्य शासनाला पाठवला. या अहवालाबाबत चर्चा करून केरळप्रमाणे आयजीआयबी या संस्थेसह सामंजस्य करार करून राज्यातील करोनाबाधितांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सामंजस्य कराराअंतर्गत दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातील २५ नमुने या प्रमाणे तीन महिने नव्या उत्परिवर्तनाच्या अनुषंगाने परीक्षणासाठी पाठवले जाणार आहेत. राज्यातील जिल्ह््यांचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार नमुन्यांची संख्या बदलू शकते. नमुन्यांची संख्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडून निश्चित करण्यात येईल.

होणार काय?

करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाचा अभ्यास तीन फेऱ्यांमध्ये होणार असून, प्रत्येक फेरीसाठी एक महिना या प्रमाणे तीन फेऱ्यांसाठी तीन महिने इतका कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन निर्णयाद्वारे दिली.

उपयोग काय?

जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) याचा अर्थ जिनोम म्हणजे जनुकसंचातील सर्व ‘डीएनए’चा अभ्यास. जनुकीय क्रमनिर्धारणाचा वापर नव्या विषाणूची ओळख पटवण्यासाठी केला जातो. राज्यात अचानक करोना संसर्ग कसा वाढला, याचा तपशील या जनुकीय क्रमनिर्धारणातून मिळू शकेल.