भारतात सध्या जनुकसंस्कारित पिके सुरक्षित आहेत की नाही याबाबत अकारण वाद निर्माण केले जात असले तरी  पहिल्या पिढीतील जनुक संस्कारित पिके (जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स) सुरक्षित आहेत त्याबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असा निर्वाळा जैवतंत्रज्ञान खात्याचे सचिव के. विजयराघवन यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिला. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते.
जनुक संस्कारित पिकांची सुरक्षितता व त्यांच्या चाचण्या याबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, गोल्डन राईस, बी.टी कॉटन, बीटी वांगे यासह पहिल्या टप्प्यात जी जनुकसंस्कारित पिके तयार करण्यात आली ती सुरक्षित असून त्यामुळे मानवी आरोग्यास अपाय नाही. बांगलादेशमध्येही बी.टी. वांग्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी, सुरक्षितता अशा मुद्दय़ांच्या आधारे वाद निर्माण केले जात असले तरी बी.टी वांग्यामुळे वांग्याच्या रोपांवर जी कीडनाशके फवारावी लागतात ती बीटी वांग्यावर फवारावी लागत नाहीत त्यामुळे कीडनाशकांवरचा मोठा खर्च वाचतो शिवाय आरोग्यावर त्यामुळे होणारे दुष्परिणामही टळतात. त्यामुळे जनुकसंस्कारित पिकांचे महत्त्व भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांसाठी जास्त आहे. कुठल्याही तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आधी नकारात्मक भावनाच असते. विमान सर्वात सुरक्षित जमिनीवर असते म्हणून ते उडवायचेच नाही असे करून आपला देश पुढे जाणार नाही. जैवतंत्रज्ञान विभागाने खारपड जमिनीत व दुष्काळातही टिकाव धरू शकेल अशी तांदळाची प्रजाती विकसित केली आहे. त्यासाठी पिख  या जनुकाचे क्लोनिंगही करण्यात यश आले आहे.
जैवतंत्रज्ञान विभागाला तीस वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त पुण्यात आले असताना त्यांनी सांगितले की, सध्या जैवतंत्रज्ञान विभागाने जैवइंधनांच्या निर्मितीला महत्त्व दिले आहे. शिवाय सौर ऊर्जा थेट डीसी (म्हणजे डायरेक्ट करंट) स्वरूपात उपलब्ध केल्याने खेडय़ांमध्ये फार मोठे बदल घडून येणार आहेत. लशींच्या पातळीवर विचार करायचा तर जैवतंत्रज्ञान विभागाने रोटाव्हायरसवरची ‘रोटोव्हॅक’ ही लस एक डॉलरला उपलब्ध करून दिली ही मोठी कामगिरी आहे. ही लस सुरक्षित असून त्याच्या चाचण्या घेतल्यानंतरच ती उपलब्ध करण्यात आली आहे. आता त्यात अमेरिका व भारत हे सहकार्य करीत आहेत. बाळाच्या जन्माच्यावेळी बाळ व आई यांना जंतूसंसर्गाने जो धनुर्वात होत असतो त्यावरील लस आम्ही तयार केली आहे. त्यामुळे भारत या प्रकारच्या धनुर्वातापासून मुक्त झाला आहे. पोलिओ निर्मूलनानंतर आपण मिळवलेले हे मोठे यश आहे. विशेष म्हणजे आम्ही या लशी कमी पैशात उपलब्ध करून दिल्या आहेत. जगात तयार होणाऱ्या दर तीन लशींपैकी दोन भारतात उत्पादित असतात अशी स्थिती आहे. मलेरियावर ‘जायव्हॅक १’ ही लस तयार केली असून ती किफायतशीर दरात मिळेल. डेंगी या रोगावर लस तयार करण्याचे काम चालू आहे, त्याचबरोबर क्षयाच्या दोन जीवाणूंवर लस तयार करण्याचे काम चालू आहे. अलीकडेच मनूप्रकाश यांनी जो फोल्डस्कोप नावाचा सूक्ष्मदर्शक तयार केला आहे त्याची किंमत १ सेंट इतकी कमी आहे, तो सूक्ष्मदर्शक संयुक्त प्रकल्प हाती घेऊन सर्व मुलांना उपलब्ध करून दिला जाईल, त्यातून सूक्ष्मजीवांचे निरीक्षण व संशोधन कमी खर्चात करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जैवतंत्रज्ञान विभागाची कामगिरी
अतिसारावर उपयुक्त ‘झिंक डी’ गोळ्यांची निर्मिती
इ-कोलाय व साल्मोनेला जीवाणू तपासण्यासाठी संच
खनिज व जीवनसत्त्व यांचे कुपोषित मुलांसाठी २१ घटकांचे मिश्रण
लोह व फॉलिक अॅसिड यांच्या गोळ्या
सोडियम व लोहयुक्त गव्हाचे पीठ