News Flash

जर्मन बेकरीत बाँबस्फोट करण्याचा कट कोलंबोत रचला गेला

जर्मन बेकरीत बाँबस्फोट करण्यापूर्वी हिमायत बेग हा श्रीलंकेतील कोलंबो शहरात लष्करे ए तोएबा या दहशतवादी संघटनेचे म्होरके फैय्याज कागझी आणि जबीउद्दीन अन्सारी यांना भेटला होता.

जर्मन बेकरीत बाँबस्फोट करण्यापूर्वी हिमायत बेग हा श्रीलंकेतील कोलंबो शहरात लष्करे ए तोएबा या दहशतवादी संघटनेचे म्होरके फैय्याज कागझी आणि जबीउद्दीन अन्सारी यांना भेटला होता. तेथेच जर्मन बेकरी बाँबस्फोटाचा कट रचण्यात आला होता, असा दावा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केला होता.
बीडमधील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मिर्झा हिमायत इनायत बेग याने २००५ मध्ये पुण्यातील आझम कॅम्पसमधून डी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्याचे वडील इनायत यांचे बीडमध्ये जिलेबी विक्रीचे छोटे दुकान आहे. वडील, आई आणि लहान भावासोबत राहत असलेल्या हिमायत याने उदगीरमध्ये ग्लोबल इंटरनेट कॅफे सुरू केले होते.
जर्मन बेकरीत बाँबस्फोट करण्यापूर्वी तो सन २००८ मध्ये कोलंबोत गेला होता. तो लष्करे ए तोएबा या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्रातील म्होरक्या होता. कोलंबोत तो फैय्याज कागझी आणि जबीउद्दीन अन्सारी याला भेटला होता. तेथे त्यांनी पुण्यातील जर्मन बेकरीत बाँबस्फोट करण्याचा कट रचला. बेग याच्या पारपत्रावर तो श्रीलंकेत गेल्याच्या नोंदी आहेत. बेग हा पाच बनावट नावांचा वापर करून वावरत असे. त्याने बनावट कागदपत्रे तयार केली होती. जवळपास पंचवीस ई-मेल आयडींचा तो वापर करत होता. जर्मन बेकरीत बाँबस्फोट घडविण्यापूर्वी त्याने जानेवारी २०१० मध्ये जर्मन बेकरीची पाहणी (रेकी) केली होती. उदगीर येथील इंटरनेट कॅफेत बेगला मोहसीन चौधरी, यासीन भटकल भेटले होते. तेथेच बाँब तयार करण्यात आला होता, असा दावा एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात करण्यात आला होता.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी बेग आणि यासीन हे लातूरहून एसटी बसने पुण्यात आले. पूलगेट येथून ते रिक्षाने कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीजवळ आले आणि सॅकमध्ये दडविलेला बाँब ठेवून पसार झाले. सायंकोळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी स्फोट झाला आणि १७ निरपराध मृत्युमुखी पडले. या बाँबस्फोटात ५८ जण जखमी झाले होते.
जर्मन बेकरी बाँबस्फोटाचा घटनाक्र म
१३ फेब्रुवारी २०१०- कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत बाँबस्फोट, १७ ठार आणि ५८ जखमी.
७ सप्टेंबर २०१०- पुण्यातील लष्कर परिसरात पूलगेट येथे एटीएसने हिमायत बेग याला पकडले.
४ डिसेंबर २०१०- बेग याच्यासह सहाजणांविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.
२५ जून २०१२- औरंगाबाद येथील स्फोटकांचा साठा आणि जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी जबीउद्दीन अन्सारी याचे सौदी अरेबियातून हस्तांतरण.
 १८ एप्रिल २०१३- विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी बेग याला फाशीची शिक्षा ठोठावली.

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने हिमायत बेग याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अद्याप निकालपत्र मिळालेले नाही. निकालपत्र पाहून पुढील कार्यवाही केली जाईल.
भानुप्रताप बर्गे, सहाय्यक पोलीस आयुक्त (एटीएस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 2:34 am

Web Title: german bakery blast conspiracy colombo
Next Stories
1 द्रुतगती मार्गावर खासगी बसच्या अपघातात दोन ठार; सात जखमी
2 अभियांत्रिकीच्या जागा रिक्त असूनही नवी महाविद्यालये सुरू करण्याची हौस कायम
3 पुणे विभागातही शेतकऱ्यांकडे वीजबिलाचे ७८ कोटी थकले
Just Now!
X