२०१० सालच्या पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग याला पुण्याच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱया दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) हा मोठा धक्का मानला जात आहे.
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी असलेल्या बेगने सप्टेंबर २०१० मध्ये जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट घडवला होता, असे नमूद करत पुण्याच्या विशेष न्यायालयाने २०१३ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात बेगने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हिमायत बेग याचा हात असल्याचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश पाटील आणि एस.बी.शुक्रे यांच्या खंडपीठाने हिमायत बेग याला स्फोटकं जवळ बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सप्टेंबर २०१० साली पुण्यातील जर्मन बेकरी येथे घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट हिमायतचा हात असल्याचे उघड झाले होते. या स्फोटात १७ जण मृत्युमुखी पडले होते, तर ५८ जण जखमी झाले होते. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश होता.