पुणे विद्यापीठ जर्मन विभाग आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वतीने जर्मन भाषा शिक्षणाच्या शताब्दी महोत्सावानिमित्त ‘जर्मेनिया’ २०१४ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व कला दालन येथे ७, ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत खुले राहणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. जर्मनीच्या दुसऱ्या महायुध्दानंतरचा इतिहास, बर्लिनची भिंत, जर्मनीतील संस्कृती,नाटक, साहित्य, संगीत, सण इत्यादी विविध पैलूंवर पोस्टरद्वारे प्रदर्शनात प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, पुण्यात असलेल्या जर्मन कंपन्या या प्रदर्शनात पोस्टर्सद्वारे दाखविल्या जाणार आहेत. स. प. महाविद्यालय, फग्र्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठाचा जर्मन विभाग आणि विविध संस्था, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी ही पोस्टर्स तयार केली आहेत. ऑस्ट्रियन छायाचित्रकाराने पोस्टरद्वारे घडवलेले भारताचे दर्शन हे या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.