घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा गणेशोत्सवानंतर होणार आहे. त्यामुळे पंजाबच्या भूमीतील संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान संपादन करण्यास उत्सुक असलेल्या साहित्यिकांना किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे आगामी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन फेब्रुवारी किंवा तेथील हवामानाचा अंदाज ध्यानात घेऊन मार्चमध्ये देखील होऊ शकते. संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली असली, तरी संमेलनाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. साहित्य महामंडळ पदाधिकारी आणि संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर १५ ऑगस्टपूर्वी संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. साहित्य महामंडळाच्या आगामी बैठकीमध्ये संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, गणेशोत्सव पार पडल्याखेरीज महामंडळाची बैठक होणार नसल्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.
साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यापासून ते मतपत्रिका महामंडळाकडे परत येणे आणि मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया देखील दोन महिन्यांची आहे. त्याचप्रमाणे संमेलनाच्या किमान दोन महिने आधी नूतन अध्यक्ष निवडले जावेत, असेही घटनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू करून दिवाळीपूर्वी नवे संमेलनाध्यक्ष निश्चित होणार आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक, समीक्षक आणि ललित लेखक अशा संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या चार उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.