वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना

पुणे : वाहतूक नियमांचे पालन करणारा तसेच नियमभंगाची कोणतीही कारवाई न झालेला वाहनचालक यापुढील काळात वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत आढळल्यास त्याला ‘गिफ्ट व्हाऊचर’ देण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या या योजनेमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन मिळणार असून आठवडाभरात वाहतूक पोलिसांची ही योजना कार्यान्वित होणार आहे.

पुण्यात नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावतात. गेल्या वर्षभरापासून पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी इ-चलन यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. वाहनचालक कारवाई दरम्यान सापडल्यास त्याने यापूर्वी केलेल्या नियमभंगाची माहिती वाहतूक पोलिसांना काही क्षणात कळते. वाहनचालका विरोधात वाहतूक नियमभंगाचा कोणताही खटला दाखल झालेला नसेल तर त्याला पोलिसांकडून गिफ्ट व्हाऊचर देण्याची योजना येत्या काही दिवसात राबविण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.या योजनेसाठी संगणकीय प्रणाली तयार करण्यात येणार आहे. कारवाई दरम्यान वाहनचालकाची तपासणी करण्यात येते. त्याच्याकडे वाहनांची कागदपत्रे असल्यास, तसेच त्याच्या विरोधात नियमभंगाचा कोणताही खटला दाखल न झाल्याचे आढळून आल्यास एक क्रमांक वाहनचालकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येईल. क्रमांक ‘गिफ्ट व्हाऊचर’च्या स्वरूपात असेल. वाहनचालकाने मॉल, दुकाने येथून काही खरेदी केल्यास त्याला खरेदीवर दहा टक्क्य़ांपर्यंत सूट देण्यात येईल.

वाहनचालकाने ई-चलन दंडाची रक्कम थकविली नसेल आणि तो वाहतुकीचे नियम पाळत असल्याचे दिसून आल्यास त्याला ‘गिफ्ट व्हाऊचर’ देण्यात येईल. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, या विचाराने ही योजना सुरू करण्यात येणार आहे. प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येईल. येत्या आठवडाभरात ही योजना कार्यान्वित होणार आहे.

– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग