नेपाळमधील भूकंपानंतर मदत कार्यासाठी पुढे आलेल्या गिरिप्रेमी संस्थेच्या निधी संकलनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्रिपुरेश्वर (जि. धाडिंग) गावातील शाळेच्या उभारणीसाठी ‘फ्री रनर्स’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट’ या संस्थांनी दहा लाख रुपयांचा निधी शनिवारी सुपूर्द केला.
फ्री रनर्सचे संस्थापक कमांडर जितेंद्रन नायर, रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्टचे अध्यक्ष जितू मिरचंदानी आणि संगीता ललवाणी यांनी गिरिप्रेमी संस्थेच्या संस्थापक उष:प्रभा पागे यांच्याकडे दहा लाख रुपयांचा धनादेश शनिवारी सुपूर्द केला. हा निधी काठमांडूपासून १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिपुरेश्वर गावातील शाळेच्या पुनर्वसनासाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती पागे यांनी दिली. आम्ही दरवर्षी नेपाळ हिमालयामध्ये गिर्यारोहण मोहिमा आणि पदभ्रमणासाठी जात असल्याने नेपाळवासीयांशी आमचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच संकटात सापडलेल्या मित्रांच्या मदतीला धावून जाणे हे कर्तव्य मानतो. भूकंपामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या या शाळेचे पदाधिकारी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल साशंक झाले आहेत. तरीही अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये शाळा पुन्हा सुरू झाली असून भूकंपरोधक इमारत उभारणीबरोबरच बाक, फळा या सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या पुनर्वसनासाठी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून गिरिप्रेमीतर्फे निधी उभारणीसाठी आवाहन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
फ्री रनर्स संस्थेच्या सभासदांनी मे महिन्यांत आपल्या कुवतीनुसार काही अंतर पळून अथवा चालून कापले. महिन्याच्या शेवटी महिनाभरात कापलेल्या अंतराच्या प्रत्येक किलोमीटरमागे काही रक्कम मदत निधी म्हणून त्या सदस्याने दान केली. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्टतर्फे काही रक्कम मिळून दहा लाख रुपयांचा निधी संकलित झाला असल्याची माहिती नायर आणि मिरचंदानी यांनी दिली.