पालकमंत्री गिरीश बापट यांची अपेक्षा

हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृद्धी करताना अन्नसुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासनमंत्री आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्नसुरक्षाअंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन, साठवण, हाताळणी आणि विक्रीसंदर्भात हॉटेल, रेस्टॉरंट, केटर्स व्यावसायिकांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, सं. मा. देशमुख, पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी आणि सचिव किशोर सरपोतदार या वेळी उपस्थित होते.

राज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांसाठी अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून बापट म्हणाले,  हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांकडून तत्काळ जेवणाचा दर्जा ठरविला जातो. त्याचा परिणाम व्यवसायवृद्धीवर होत असतो. त्यामुळे जेवण तयार करताना पदार्थाची गुणवत्ता राखण्याबरोबरच तेथे स्वच्छतेबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंशिस्त बाळगावी. ज्यामुळे ग्राहकांचेही समाधान होईल आणि एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. हॉटेल व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्यासाठी विभागामार्फत वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल.

हॉटेल व्यवसाय करताना कच्चा माल खरेदी ते पदार्थ तयार होईपर्यंत पाळावयाच्या नियमांबाबत डॉ. पल्लवी दराडे यांनी माहिती दिली. पुणे विभागांतर्गत तीनशे मंदिरांच्या विश्वस्तांना त्यांच्या मंदिरामार्फत वाटण्यात येणारा प्रसाद तयार करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर, पुढील तीन महिन्यांत ४० ते ५० हजार हॉटेल व्यावसायिकांना याबाबत प्रशिक्षित करण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसायामध्ये १२ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल असणाऱ्यांसाठी परवान्याची तर, त्यापेक्षा कमी रकमेची उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांना नोंदणीची आवश्यकता असल्याचे दराडे यांनी सांगितले.