पुण्यात समान पाणी पुरवठा योजना आणि प्रशासनाच्या कामकाजावरून दोन गट पडले आहेत. नगरसेवकांच्या एका गटाने खासदार संजय काकडे यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे मांडले. गिरीश बापट यांना याबाबत प्रश्न विचारताच भाजपमध्ये कोणतीही गटबाजी खपवून घेणार नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. आमच्यात कोणतीही गटबाजी नाही आणि कोणाची गटबाजी खपवून घेणारही नाही असे म्हणत त्यांनी संजय काकडे यांना टोला लगावला.

पुणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांना अधिकारी सहकार्य करत नाहीत आणि समान पुरवठा योजनेची कोणतीही माहिती दिली जात नाही. माहिती न देता ही योजना मंजुरीसाठी ठेवली जाते. ही कारणे समोर ठेवून दोन दिवसांपूर्वीच संजय काकडे यांच्यासोबत ४३ नगरसेवकांची बैठक झाली. त्याच बैठकीपासून पुण्यात बापट विरूद्ध काकडे अशी गटबाजी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. समान पुरवठा योजनेसंदर्भातील तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे काकडे यांनी सांगितल्याने बापट विरूद्ध काकडे असा गट दिसणार का? याची चर्चाही पुण्यात रंगली.

या सर्व घडामोडीना ४८ तास होत नाही.तोवर आज पुणे महापालिकेत पालकमंत्री गिरीश बापट हे आले आणि भाजप नगरसेवकाशी त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की,प्रत्येक नगरसेवकाने काम करत रहा. स्वतःच्या कामांमुळे पाठ थोपटून घेऊ नका.तर नागरिकांनी आपल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. असे सांगत ते पुढे म्हणाले की,जानेवारीपासून प्रभाग निहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात काम करताना कामाची वाटणी करून घ्यावी असेही बापट यांनी स्पष्ट केले.