लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युती समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून पक्षाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीमधून गिरीश बापट बाहेर पडले असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली आहे. युतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना समन्वय असावा यासाठी या दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांची समन्वयक म्हणून नावे निश्चित करण्यात आली आहेत. शिवसेनेकडून आमदार, डॉ. नीलम गोऱ्हे यांची तर भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा आणि मावळ (रायगडमधील तीन विधानसभा मतदार संघ वगळून) अशी जबाबदारी बापट यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा दावा आपोआप रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी काही नावे चर्चेत आहेत. त्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नावांचा समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षाकडील उमेदवारीचा दावा संपला आहे. त्यामुळे खासदार अनिल शिरोळे यांच्यापुढे पालकमंत्री गिरीश बापट यांचे तगडे आव्हान होते. मात्र युती समन्वयक म्हणून पक्षाने जबाबदारी सोपविल्यामुळे बापट उमेदवारीच्या शर्यतीमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे.

बापट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजप आणि शिवसेनेबरोबर अन्य पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जबाबदारी दिली असली, तरी त्यांच्या उमेदवारीचा दावा कायम असल्याचे असे बापट समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.