सर्वधर्मीय सणांमध्ये ध्वनिवर्धक आणि डीजेच्या वापरावर र्निबंध आणण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच धोरण करेल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. रविवारची (२३ सप्टेंबर) गणेश विजर्सन मिरवणूक न्यायालयाचा सन्मान राखून निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात मानाच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष आणि सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

डीजेच्या वापरावर र्निबंध आल्याच्या निषेधार्थ शहरातील ७० हून अधिक मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग न घेता गणपती मांडवातच ठेवण्याची भूमिका घेतली होती.

यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडण्यामध्ये राज्य शासनाला अपयश आले असल्याचा ठपका ठेवत केवळ हिंदूच्या सणांवरच र्निबध आणले जातात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. त्यासंदर्भात महापौर बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी ही माहिती दिली. महापौर मुक्ता टिळक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे आणि दीपक पोटे वेळी उपस्थित होते.

ध्वनिवर्धक,  डीजेच्या वापरासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार सर्वानी कायद्याचे पालन करावे. न्यायालयाचा अवमान होईल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन करतानाच ‘कार्यकर्ते असे कृत्य करणार नाहीत याची खात्री आहे’, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. काही मंडळांनी घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेसंदर्भात बापट म्हणाले, कार्यकर्त्यांच्या काही भावना असल्या तरी सरकार आणि न्यायालय सर्व जनतेचा विचार करत असते. शासन कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. न्यायालयीन लढाई न्यायालयातच लढावी लागते. विसर्जन मिरवणुकीत बळाचा वापर करू नये आणि बळाचा वापर करणार नाहीत, अशा सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने २०१४ नंतर दाखल झालेले सामाजिक स्वरुपाचे ८३ गुन्हे मागे घेतले आहेत. यासंदर्भात मी आणि सुधीर मुनगंटीवार यांची उपसमिती आहे. शारीरिक इजा आणि सार्वजनिक नुकसान पाच लाख रुपयांहून अधिक असते त्या गुन्ह्य़ांमध्ये वकिलामार्फत न्यायाधीशांना विनंती करावयाची असते.

राज्य शासनही तशा विनंती न्यायालयाला करते. नुकसान भरपाईची रक्कम भरल्यानंतर ८३ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. ज्यांना आरोप करावयाचे असतील त्यांनी राजकीय आखाडय़ात उतरुन लढावे, असे आव्हान संजय बालगुडे यांना नामोल्लेख टाळून बापट यांनी दिले.