‘पद्मावती’ चित्रपटातील अमान्य असणाऱ्या चित्रिकरणाला कात्री लावूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी द्यावी, अशी भूमिका भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे. देशभरात पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी होत असताना पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करु नये, अशी विनंती पोलिस प्रशासनाला केली आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पद्मावती चित्रपटातील आक्षेप असणाऱ्या गोष्टी वगळून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे केल्याचे ते म्हणाले. सेन्सॉरने मान्य केले आहे, पण आपल्याला मान्य नाही त्या चित्रिकरणासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतली. या चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिली आहे. दुर्दैवाने कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करणे टाळले आहे. सेन्सॉरच्या निर्णयावर कारवाई करणे सरकारच्या अधिकाराखाली नाही. मात्र, सरकार यात हस्तक्षेप करुन योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी हा चित्रपट १ डिसेंबर प्रदर्शित होणार होता. मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’ला राजपूत संघटनांचा विरोध होत आहे. करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना उघडपणे धमकीही दिली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.