‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर’ पुस्तकाचे प्रकाशन

आपल्या नियत चौकटीचा सन्मान करून गोविंदराव तळवलकर यांनी आयुष्यभर निष्ठेने आणि कर्तव्याने काम केले. ही अलिप्तता पाळण्याच्या तटस्थ वृत्तीचा त्यांना फायदा झाला. व्यवस्थेपासून लांब राहून व्यवस्थेवर टीका करण्याचे नैतिक सामथ्र्य गोविंदराव यांच्यामध्ये होते. व्यवसायाशी प्रतारणा होण्याचा धोका त्यांनी कधी पत्करला नाही. प्रलोभनांपासून ते दूर राहिले. अशी नैतिक ताकद संपादकामध्ये असावी लागते, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साधना ट्रस्ट आणि साधना प्रकाशनतर्फे डॉ. निरुपमा आणि सुषमा तळवलकर यांनी लिहिलेल्या तळवलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अज्ञात पैलू उलगडून दाखविणाऱ्या ‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ‘संपादक तळवलकर’ या विषयावर कुबेर यांचे व्याख्यान झाले. माजी मंत्री विनायकदादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टचे सल्लागार दत्ता वान्द्रे आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.

कुबेर म्हणाले, गेल्या २५-३० वर्षांचा कालखंड हा प्रतारणांचा आहे.  शिक्षक, नोकरशहा, न्यायव्यवस्था आणि राजकीय पक्षांना आपली चौकट मोडून इतर गोष्टी करण्यामध्ये रस वाढत आहे. संपादकांनाही खासदार होण्याची स्वप्ने पडतात. अशा काळात गोविंदरावांच्या आदर्श पत्रकारितेचे महत्त्व ध्यानात येते. ‘माझ्या चौकटीबाहेर मला जायचे नाही’, असे ते  सतत सांगत असत. संपादक हा संपादकच असला पाहिजे. त्याचा कार्यकर्ता होता कामा नये, हे तत्त्व त्यांनी पाळले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यातील संपादक जागा होता. प्रत्येकाने अचूक लिहिले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्यातील तरलता, ग्रंथप्रेम आणि संस्कृतीप्रेम अखेपर्यंत कायम राहिले. पोटतिडकीने कौतुक आणि टीका कशी करावी हे गोविंदरावांनी शिकविले. महाराष्ट्राच्या पत्रकारितेसाठी गोविंदराव हे दीपस्तंभ आहेत.

निरिच्छ आणि परिणामांची पर्वा न करणारा संपादक असा गोविंदरावांचा गौरव करून पाटील म्हणाले, अग्रलेखातून टीका केल्याबद्दल कोणीही गोविंदरावांचा दीर्घकाळ द्वेष केला नाही. असा माणूस मोठेपणाच्या कक्षेबाहेरचा असतो. पत्रकारिता कशी करावी याचे उत्तर गोविंदराव तळवलकर हेच द्यावे लागते. अशी माणसे समाज समृद्ध करत असतात. महाराष्ट्र गोविंदरावांच्या कर्तृत्वाचा ऋणी आहे.

गोविंदराव यांचे लेखन मराठीत असल्यामुळे मी ते वाचू शकलो नाही, पण त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पांतून मला मूर्धन्य पत्रकाराचे दर्शन घडले. विचारांच्या निरंतरतेमधून त्यांच्यामध्ये आलेली परिपक्वता माझ्यामध्ये संक्रांत झाली, असे आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले. विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.