३१ डिसेंबर आणि नववर्षाचा आनंद साजरा करत असताना सुरक्षेची योग्य ती काळजी घ्या, अशा वारंवार सूचना देऊनही काही जणांकडून त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे विशेषत: रस्त्यावर अनेक अपघात घडतात. पुण्यात सोमवारी पहाटे अशीच एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका तरूण-तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. सरबजीत नायर (वय-२९ रा.विमान नगर.) शेफाली उपाध्याय (रा.विमाननगर मूळ भोपाळ) असे मयत तरुण आणि तरुणीचे नाव आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या ब्राह्मणवाडी येथे पहाटे हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरबजीत आणि शेफाली आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पुण्याहून लोणावळ्याला जात होते. हे सर्वजण तीन दुचाकींवरून मद्यधुंद अवस्थेत लोणावळ्याच्या दिशेने प्रवास करत होते. यापैकी एका दुचाकीवर सरबजीत आणि शेफाली बसले होते. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे ब्राह्मणवाडी येथे दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे दोघे खड्ड्यात जाऊन पडले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सरबजीत आणि शेफाली हे दोघे ही विमाननगर येथील एका खासगी कंपनी मध्ये कामाला होते. शेफाली उपाध्याय ही मूळ गाव भोपाळची (मध्यप्रदेश) असून सरबजीत नायर हा केरळचा राहणारा आहे. सध्या वडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.