हिंजवडी परिसरात डॉक्टरच्या हजगर्जीपणामुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना २०१७ मध्ये घडली होती. याला ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दुजोरा दिल्याने तब्बल १६ महिन्यानंतर याप्रकरणी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली होती.

या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने संबंधित आरोपी डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर डॉ. रामकृष्ण जाधव यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेनंतर तब्बल १६ महिन्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रज्ञा अरुण बोरुडे (वय १३) हिला थंडी-ताप येत असल्याने डॉ. रामकृष्ण जाधव यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. यावेळी डॉ. जाधव यांनी तपासणी करून प्रज्ञाला उजव्या कमरेवर इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रज्ञा घरी गेली मात्र इंजेक्शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कंबरेवर व पाठीवर काळे चट्टे आणि फोड आल्याने तिला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

दरम्यान, यासंबंधी डॉ. रामकृष्ण जाधव हेच जबाबदार असून त्यांच्याविरोधात मृत प्रज्ञाचे वडील अरुण बोरुडे यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू ठेवला, मृत मुलींवर झालेल्या उपचारांची सर्व कागदपत्रे पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आली. त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात हिंजवडी पोलिसांकडे आला. यामध्ये संबंधित आरोपी डॉ. जाधव यांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा करीत चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने जंतूंप्रदूर्भाव होऊन मुलीचा मृत्यू झाला.

घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी ए. एम. पगार करीत आहेत.