वायरमन, मोटर मॅकेनिकल अभ्यासक्रमांनाही प्रवेश

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसारख्या (आयटीआय) रोजगाराभिमुख क्षेत्राकडे मुलींचा कल वाढावा, यासाठी त्यांना ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ‘बेसिक ब्युटी पार्लर’सारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचा सध्या आयटीआयमधील अन्य अभ्यासक्रमांकडेही कल वाढला आहे. शासकीय आयटीआयमध्ये वायरमन, मोटर मॅकेनिकल, टर्नर, फिटर या अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींच्या प्रवेशाची टक्केवारी उल्लेखनीय स्वरूपाची आहे.

तंत्रज्ञानातील बदलांचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होत आहे.  कंपन्यांकडून तंत्रकुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे राज्यातील आयटीआयमधील जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आयटीआयमधील ब्युटी पार्लर, डिझायनिंग हे अभ्यासक्रम वगळले तर इतर अभ्यासक्रमांना केवळ मुलांचाच प्रवेश राहायचा. त्यामुळे सरकारने विद्यार्थिनींसाठी आयटीआयमध्ये ३० टक्के आरक्षण देऊ केले आहे. परिणामी मुलींना आयटीआयमध्ये प्रवेश घेणे सुलभ झाले आहे.  विशेष म्हणजे, ८० ते ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या मुलींचाही आयटीआयकडे कल आहे. फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन व डिझाइन, ड्रॉफ्ट्समन, बेसिक ब्युटी पार्लर आदी अभ्यासक्रमांना विशेष पसंती देत आहेत. यासह सेवा आणि उत्पादन क्षेत्रामध्ये वायरमन, मोटर मॅकेनिकल, टर्नर, फिटर, वेल्डर इकडे मुली वळत आहेत.

रोजगाराची चांगली संधी

आयटीआयमधील वायरमन, मोटर मॅकेनिकल, टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशीयन अशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन मुलींही रोजगार मिळवू शकतात, अशी प्रतिक्रिया शासकीय आयटीआयमधील विद्यार्थिनींनी व्यक्त केली. औद्योगिक क्षेत्रामध्ये आज अनेक बदल होत आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यामध्ये मुलींनाही रोजगाराच्या चांगल्या संधीने प्रवेश घेत असल्याचे काही मुलींनी सांगितले.

मुलींचे ‘आयटीआय’ फुल्ल

राज्यात खास मुलींसाठी १५ ‘आयआयटीआय’ महाविद्यालये उघडण्यात आली आहेत. यात नागपुरातील आयटीआयला राज्यात सर्वाधिक पसंत मिळत असून येथील ४५० जागांवरील प्रवेश फुल्ल असल्याचे प्राचार्य सचिदानंद दारुंडे यांनी सांगितले. येथील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीशीयन अशा अभ्यासक्रमांना अधिक पसंती असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रवेशित मुलींची आकडेवारी

   सन            मुले    मुली

२०१७-१८   ८३०    २५१

२०१८-१९   ८४६    २३७

२०१९-२०   ८५२    १८४